शाळा आणि ट्रॉफी
सद्या सगळीकडे शाळा आणि ट्रॉफी हे समीकरण आपण नेहमीच पाहतो आणि हे सर्व पाहताना नक्कीच आपल्याला आनंदही होतो,पण माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेच्या बाबतीत आपण ऐकाल तर खरंच शाळा आणि ट्रॉफी याविषयी नवल न वाटेल तर नवलच.सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांना काळाबरोबर चालायचं असेल तर बालवयापासून विविध स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण ही काळाची गरज बनली आहे.आणि ती बनलीही पाहिजे.तरच भविष्यात मुलं शिक्षण प्रवाहात टिकून राहणार आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे.वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मुलांनी याच वयात दिल्या की,त्यांना भविष्यात कोणत्याही परिक्षेविषयी भीती किंवा न्यूनगंड राहत नाही.शिवाय त्यांचा यशप्राप्तचा मार्ग सुकर होतो.ही आजची काळाची गरज ओळखून मुलांना वेगवेगळ्या परीक्षेस बसवणे आवश्यक झाले आहे.यासाठी शहरी भागात पालक आपल्या मुलांना मोठमोठ्या नावाजलेल्या शिकवणी लावतात.मुलांना त्यासाठी हवे नको ते सर्व पुरवतात.अगदी होम ट्युशन सुध्दा सध्या बऱ्याच प्रचलित झालेल्या दिसून येत आहेत.मग यामध्ये ग्रामीण भागातील मुलांनाही अशा परीक्षा देता याव्यात यासाठी सध्या mts, BTS scholarship, नवोदय या वेगवेगळ्या परीक्षा आहेत.पण पाचवी आणि आठवी वर्गाला जरी scholarahip आणि नवोदय या स्पर्धा परीक्षा आहेत तरीही आपण त्या खालील वर्गात सुध्दा मुलांना स्पर्धा परीक्षेच्या अनुभवासाठी, स्वतः ला आजमावण्यासाठी BTS,MTS अशा परीक्षेस बसवू शकतो. मला सुध्दा माझ्या शाळेतील मुलांना या परीक्षेचा अनुभव द्यायचा होता,मुलांना त्यासाठी तयार करायचं होत. कारण याआधी या शाळेने म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेने यापूर्वी कधी ट्रॉफी मिळवली असं ऐकण्यात व पाहण्यात आले नाही. नक्कीच.. कारण यापूर्वी शाळेची विद्यार्थी संख्या जेमतेम पाच ते सात तीही कशीतरी ओढून ताणून मिळालेली. मग ट्रॉफीचा संबंध या पाच ते सात विद्यार्थ्यांशी असेल असं असणं जरा अशक्यच. वर्ग एक ते चार ची विद्यार्थी संख्या अगदी बोटावर मोजण्यासारखे असल्याने येथे इतर स्पर्धा परीक्षांचा संबंध दुरापास्तच होता. परंतु जेव्हा 2018 ला ऑनलाइन बदलीनं या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे रुजू झाले तेव्हा पासून शाळेची विद्यार्थी संख्या दरवर्षी क्रमाक्रमाने वाढतच गेली. मुलांमध्ये वेगवेगळ्या कृती,उपक्रम, राबविल्याने एक नवचैतन्य निर्माण झाले. मुलांमध्ये उत्साह वाढला स्वयं अध्ययनाची सवय त्यांना लागली. त्यामुळे मुलं स्वतःहून अध्ययनरत झाली. वेगवेगळ्या कृती, कविता, वेगवेगळ्या संकल्पना, पाठ्यपुस्तकातील घटक,प्रयोग,नाटिका,गायन,बडबडगीत,परीसर भेट,कृती,खेळ,प्रसंगानुरूप उपक्रम, यांचे अनेक व्हिडिओ बनवून यूट्यूबच्या मार्फत पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मुलांपर्यंत सहजपणे पोहोचू लागले. मुलांना आता अभ्यासाची चांगलीच गोडी लागली होती. म्हणून सहजच मनामध्ये आलं,आता मुलांना काहीतरी नवीन द्यायला हवं जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून जगाशी स्पर्धा करता यावी यासाठी मंथन स्पर्धा परीक्षेसाठी बसवावं हा विचार येऊन गेला. आणि तो फक्त विचारच न राहता तो प्रत्यक्षात अंमलात आणला. माझ्या शाळेतील इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी या तीनही वर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांना मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी बसवण्यात आलं. यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत होता. मला तर शाळेचा मुख्याध्यापक पदाचा पदभार,शाळेची वेगवेगळी कामे,वेगवेगळ्या मीटिंग,मतदान अधिकारी म्हणून वर्षभर सातत्याने चालू असलेली कामे,त्यातच दोन वर्ग सांभाळणे,शैक्षणिक कामे,असं सर्वच पाहत पाहत मी वर्गाची तयारी करून घेत होते. कधी कधी MTS चा एक्स्ट्रा तास घेऊन मुलांना या स्पर्धा परीक्षेतील वेगवेगळ्या संकल्पना समजावून देत होते. जास्तीत जास्त सराव करून घेत होते. वेळ मिळेल तसं प्रश्नपत्रिका सोडून घेत होते. एवढेच काय तर ते सोडवलेल्या प्रश्नपत्रिकाच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवण्यासाठी मुलांबरोबर घरी देऊन त्यांच्या देखील सह्या या उत्तरपत्रिकेवर घेत होते. कारण शाळेमध्ये प्रथमच फीस भरून वेगळ्या परीक्षेसाठी मुलांना बसवलं होतं. या फिसच्या मोबदल्यात किंवा नेमकं वेगळी परीक्षा कोणती आहे? हे पालकांनाही माहीत व्हावं हाच हेतू. 2022 पासून म्हणजे मागील सलग तीन वर्षापासून शाळेतील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही बसवतो. सुरुवातीला 20 विद्यार्थी परीक्षेसाठी बसली होती.2023 ला 26 विद्यार्थी आणि यावर्षी तब्बल 40 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी प्रथमच वर्ग दुसरी मधील 80% विद्यार्थी या परीक्षेसाठी उत्तीर्ण झाली होती. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्याच्या ठिकाणी ही ग्रामीण भागातील मुलं जाऊन परीक्षा देत होती तरीही माझ्या इयत्ता दुसरी वर्गाच्या आदित्य जनार्दन पिसाळ या विद्यार्थ्याने शहरी भागातील परीक्षा केंद्रातून सहावा क्रमांक पटकावून केंद्रस्तरीय सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह मिळवले. 2024 मध्ये याच परीक्षेसाठी वर्ग तिसरी मध्ये एकूण दहा विद्यार्थी MTS राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी बसले होते. यावर्षी देखील दहा पैकी तब्बल सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि याही वर्षी सलग दुसऱ्यांदा आदित्य जनार्दन पिसाळ या तिसरीतील विद्यार्थ्याने शहरी भागात परीक्षा देऊन केंद्रस्तरीय चौथा रँक,जिल्हास्तरीय चौरेचाळीस आणि राज्यस्तरीय एकोणपन्नास रँक मिळवून भरीव यश मिळवले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेचं नाव शाळेच्या परिसरातील पंचक्रोशीत उपक्रमशील शाळाच नव्हे तर आता स्पर्धा परीक्षेच केंद्र म्हणूनही ओळखल जाईल यात शंका नाही.आमच्यासाठी शाळेसाठी आणि गावासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे कारण पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षेत यश मिळवत होती.तेही शहरातील मुलांच्या बरोबरीने परीक्षा देऊन. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी खरोखरच अशा प्रकारचे यश मिळवतात. हे आपल्या शिक्षकांसाठी, सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे. याही वर्षी म्हणजे 2025 मध्ये माझे विद्यार्थी नक्कीच या परीक्षेमध्ये यश मिळवणार यात शंकाच नाही. म्हणूनच शाळा आणि ट्रॉफी हे समीकरण आता शाळेसाठी कायमच असणार आहे. आता मात्र शाळा आणि ट्रॉफी हे समीकरण चांगलेच जुळणार आहे यात शंका नाही.
शब्दांकन
श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे
मुख्याध्यापिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड