जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,ता.जिल्हा बीड ही जिल्हा परिषदेची शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून बीड जिल्ह्यात नावारूपास आली आहे. या शाळेत सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सातत्याने राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थी कृतिशील बनलेले त्यामुळे शाळेचा इतिहास पाहता मागील सहा वर्षात शाळेचा १ ली ते ४ थी पर्यंतचा एकूण विद्यार्थी पट अगदी 15 पटीपेक्षा जास्त वाढलेला आहे. वेगवेगळ्या खेळ, कृती यामुळे येथील विद्यार्थी हसत खेळत शाळेमध्ये येतात आणि दिवसभर वेगवेगळ्या कृतींमध्ये आनंदाने सहभागी होऊन रमून जातात. अशा वेगवेगळ्या कृतीमुळे मुलांमधील सृजनशीलतेला नक्कीच वाव मिळत आहे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना सुद्धा चालना मिळत आहे. या शाळेमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रसंगोपात सोपे उपक्रम सुद्धा राबवले जातात. अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थी स्वतःहून वेगवेगळ्या कृती करतात आणि त्या नावीन्यपूर्णतेने पूर्ण करतात. त्यामुळे अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमातही हिरीरीने सहभागी होतात आणि त्यांची चुणूक दाखवतात.युट्यूबच्या माध्यमातून त्यांची कृतिशिलता आणि सृजशीलतला वेळोवेळी दिसून येत आहे. पाठ्यक्रमातील घटक असो की आणखी वेगवेगळ्या कृती किंवा उपक्रम असो या नावीन्यपणे कशा पूर्ण होतील याकडे अगदी कटाक्षाने शाळेमध्ये लक्ष दिले जाते.
10 नोव्हेंबर 2024 रोजी बालाघाट हील मॅरॅथॉन,बीड 2024 चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व वयोगटातील लहान मोठ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ढेकणमोहा जिल्हा परिषद शाळेतील वर्ग तिसरीत शिकणारा विद्यार्थी चि.धनंजय नवनाथ काळे याचीही यासाठी ऑनलाइन नोंदणी झाली होती.10 नोव्हेंबरला बीड येथे पार पडलेल्या बालाघाट हिल मॅरेथॉन 2024 मध्ये 5 किमी अंतर अगदी सहज पार केले.अगदी वयाच्या आठव्या वर्षी त्याने अवघ्या 31 मिनिटात 5 किलोमीटर अंतर लिलया पार करून, धावून हाफ मॅरेथॉन जिंकून तिसऱ्या क्रमांकावर विजय मिळवला आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम आणि सहशिक्षिका जायभाय मॅडम यांनी त्याचे बक्षीस देवून खूप खूप अभिनंदन करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
.. धनंजयच्या या यशाबद्दल ढेकणमोहा परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निश्चितच ग्रामीण भागातील मुलांना जर योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाली की ते यशाची शिखरे अगदी सहज पार करतात हेच यातून सिध्द होते.