१३/९/२४.. आठवणीतील जन्मदिवस..

१३ सप्टेंबर २०२४…आठवणीतील वाढदिवस….

जन्मदिवसाला आपण वाढदिवस म्हणतो खरे पण तस बारकाईने पाहिले तर प्रत्येक वाढदिवसागणिक आपण वयाने मोठं होत जातो आणि जीवनात मिळालेल्या आयुर्मानातील एक वर्ष कमी होत.पण प्रत्येक वाढदिवसाला सर्वांच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाने आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत जाते आणि त्यामुळे आपले आयुष्य वाढत असावे म्हणून त्याला वाढदिवस म्हणत असावेत(माझे वैयक्तिक मत).

काल माझा ४५ वा जन्मदिवस. तस बरेच जण स्वतःच वय लपविण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करतात.पण त्यानं काय फायदा होतो माहीत नाही….अगदी भल्या पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात मी बऱ्याच स्नेहिजनांच्या WhatsApp status ला,Dp, SMS,fb post ला दिसत होते.सर्वांच्या शुभेच्छा,आशीर्वाद,भरभरून मिळत होते.पण सर्वात आनंद होता,की आजपर्यत ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यासोबत शिक्षणाचा/शिकण्या/शिकवण्याचा मनापासून आनंद घेतला असे माझे २२ वर्षांपासूनचे विद्यार्थी न विसरता आठवणीने जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत होते.

बऱ्याच दिवसांपासून मनात तारीख लक्षात ठेवून काहीही कळू न देता, स्वतः ला दिलेल्या खाऊच्या पैशातून तयारी करणारे माझे ढेकणमोहा शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जणू एखाद्या सणासारखी तयारी केली होती. आदल्या दिवशीच शाळा सुटल्यानंतर ‘ मॅडम तुम्ही उद्या शाळेत लवकर येऊ नका,थोड उशीरा या ‘असं सांगितलं.सकाळी आलेलं पाहिलं की,मॅडम,तुम्हाला सांगीतल होत ना,शाळेत लवकर येऊ नका, असं आदल्या दिवशीच मुलांनी सांगितलं.

दुसऱ्या दिवशी शाळेला येताना रस्त्याने चालत असताना मुलं धावत धावत माझ्यापर्यंत येऊन तसं रोजच मुलं शाळेकडं येताना पाहिलं की अर्ध्या वाटापर्यंत पळत येतात. कोणी पर्स घेतात, कोणी टिफिन बॅग घेतात. आज तर आमच्या चौथीच्या समीक्षाने डोळे बांधण्याचा आग्रह केला विचारल्यानंतर म्हणते कशी? मॅडम आम्ही तुम्हाला बरोबर शाळेपर्यंत घेऊन आणि डोळ्यावरती रुमाल बांधून दोघीजणींनी दोन हात धरून शाळेच्या गेट पर्यंत आणि डोळ्यावरील रुमाल पाहते तर काय… गेटवरच रंगीबिरंगी फुगे बांधली होती, सुंदर रांगोळी सजली होती आणि हॅपी बर्थडे मॅडम असं सुंदर अक्षरात रांगोळीने लिहिलं होतं.अगदी लहान मुलाच्या वाढ दिवसासारखी तयारी मुलांनी केली होती,सगळीकडे लगबग दिसत होती. मुलांची अगदी जोरदार तयारी सुरू होती. सुरुवातीला दररोज शालेय परिपाठ मुलांनी छान पूर्ण केला आणि मग सुरुवात झाली त्यांची वाढदिवसाच्या. मुलांनी वाढदिवसासाठी दोन केक आणले होते.माझी माता पालक विमल होंडरे यांनी हे बनवून दिले होते. टेबल वरती केक मांडून मुलांनी अगदी छान स्वतः फुलांचे गुच्छ सुद्धा बनवले होते. त्याची सजावट टेबलवर केलेली दिसत होती. मॅडम आज तुम्ही काहीच बोलायचं नाही, आम्ही सगळं करणार म्हणून अगदी उत्साहाने मुलं त्यांना वाटेल तशी छान तयारी करत होती. मुलांनी वाढदिवस साजरा करण्याच्या ठिकाणी बसवलं आणि तिथून पुढे मग सगळा आनंदी आनंद…मुलींनी अगदी औक्षण सुध्दा केलं.तेही आम्ही ते करणारच या हट्टानेच…मुलांनी मला केक कट करण्यासाठी सजवलेल्या खुर्चीवर बसवलं आणि हॅप्पी बर्थडे टू यू… हे गीत म्हणत सर्वांनी छान अगदी टाळ्या वाजवत मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला.प्रत्येकाच्या हातून केक खावंच लागत होता.तुमच्या आवडीचा फ्लेवर आहे madam मुद्दाम आणला आहे.थोडातरी खायचाच….हक्काचा आग्रह…कस मोडणार!!! हे ओसंडून वाहणारं प्रेम…..निखळ,निर्व्याज प्रेम…..अतुलनीय आणि अनाकलनीय…….प्रत्येकाला सेपरेट फोटो काढायचाच होता…. मधूनच थांबा आता मॅडम, तुम्ही मागे पाहू नका, असं म्हणत मुलं वर्गात गेली आणि काहीतरी घेऊन आली. आता इकडे बघा मॅडम असं म्हणत मुलांनी ते आणलेलं गिफ्ट माझ्याकडे देऊन आता बघा मॅडम असं म्हणत दिलं तर त्यामध्ये सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम होती. आता आणखी थांबा मॅडम, थोडं थांबा… परत वर्गात जाऊन परत काहीतरी घेऊन आले. आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी आणि वेगळाच आनंद दिसत होता. आता हेही पॅक खोला मॅडम, आणि पहा बरं हे गिफ्ट लय भारी….मॅडम.. असं म्हणत माझ्याजवळ दिल्यानंतर मी ते पॅकिंग काढलं आणि पाहते तर काय!!!अगदी सुंदर असा माझ्या चौथी वर्गाचा ग्रुप फोटो माझ्यासहित….. मन अगदी भरून आलं होतं मुलांची कल्पकता आणि आपल्यावर असलेला जीव पाहून मनातील भावनांना डोळ्यांनी वाट दिली… पालकांचा व्हाट्सअप ग्रुप वरती मी सर्व उपक्रमाचे फोटो टाकत असते तेव्हाच मुलांनी मला एक छान आपला पण ग्रुप फोटो घ्या बरं मॅडम आणि आम्हाला पाहण्यासाठी आपल्या ग्रुप वरती टाका असं सांगितलं आणि तोच हा फोटो…. एवढं सगळं करण्याची काय गरज होती, असं मी मुलांना विचारलं तेव्हा मुलं म्हणाले,” मॅडम आता आम्ही एवढेच वर्ष तुमच्याजवळ असणार आहोत, पुढच्या वर्षी तुमच्याजवळ नसणार आहोत म्हणून…फोटोसेशन झाल्यानंतर मुलांना आणलेली शालेय वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आला.आवडीने आणि उत्सुकतेने आणलेले gift आणि खाऊ सर्वांनी त्याचा आनंदाने आनंद घेतला…. वर्गात गेल्यानंतरही मुलांचं अजून काहीतरी सांगणं व्यक्त होणे बाकी होतं. आम्ही टाकाऊपासून उपयोगी असा पोस्ट बॉक्स तयार केला आहे त्यामध्ये मुलांनी माझ्याविषयी असलेल्या भावना आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा लिखित स्वरूपामध्ये टाकल्या होत्या. मुलांनी आता त्यामधील एक एक शुभेच्छा संदेश वर्गात गेल्यानंतर वाचायला सुरुवात केली होती त्यांच्या मनातील भावना ऐकून माझ्या मनातील भावना नक्कीच उचंबळून आल्या होत्या. आमच्या चौथी वर्गातील अनन्या शिंदे हिने तर माझ्याविषयी एक छान,तिच्या भावना व्यक्त होणारी, माझ्या आवडीनिवडी जपणारी अशी डायरी लिहिली होती ती सुद्धा ती आता वाचत होती.माझ्या स्वभावाचे, आवडीनिवडीचे एक एक पैलू समोर येत होते. आज मी खरच धन्य झाले होते.

दुपारनंतर माझ्या माता पालक वैशाली शिंदे ताई आणि नीलावती ताई परत केक घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाळेत आल्या.त्यांनीही अगदी उत्साहाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन फोटो काढले. परत माझ्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पाचवीला शिकण्यासाठी गेलेले(वर्ग नसल्यामुळे) सिद्धी, अंकिता, श्राव्या, संघर्ष, संघराज, विश्वनाथ आणि अरविंद आनंदाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाळेत आले. …. एकदा एखाद्याची जन्मतारीख माहीत झाली की,शक्यतो त्याचा वाढदिवस मी विसरत नाही.म्हणून की काय माझे चिमुकले माझा वाढदिवस आठवणीने,न चुकता,मनापासून आवडीने मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करतात…… खरंच आपण किती भाग्यवान आहोत त्यामुळेच तर आपल्याला हा निखळ आनंद आणि निर्व्याज प्रेम मिळतं .सतत मनाला एकच वाटत होत खरच किती भाग्यवान आहोत आपण मनापासून प्रेम करणारी अशी प्रेमळ माणसं आयुष्यात मिळाली!!!!!!!

आजच्या या चिमुकल्यांच्या फोटो फ्रेमने जणू काही मला मनामध्ये, मनाच्या कप्प्यामध्ये कायम मला त्यांच्या आठवणीत बांधून ठेवलं होतं. आजच हे सगळं नियोजन केलं होतं ते माझ्या चौथी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून…..खरच आयुष्यभर ही बालमन जपण्याची संधी मिळो,,,,अश्याच आपल्या शुभेच्छा,आशीर्वाद कायम लाभोत हीच विठ्ठल चरणी कायम प्रार्थना…पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार,,,कायम आपल्या ऋणात…..

बरं झालं देवा मला शिक्षक केलंस….

आपल्याच उषा मॅडम…..

1 thought on “१३/९/२४.. आठवणीतील जन्मदिवस..”

Leave a Comment