एक पाऊल स्वच्छतेकडे,प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेचा अनोखा उपक्रम..
आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक तास श्रमदान,एक पाऊल स्वच्छतेकडे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन आणि विचारांचा वारसा म्हणून श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबन बालवयातच मुलांमध्ये रुजावीत म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम, जयभय मॅडम आणि गाडीवान सर यांनी शाळेचा परिसर, गाव,बाजारतळ इत्यादी ठिकाणी परिसर स्वच्छता हा उपक्रम राबविण्याचे ठरवले.त्याची तयारीही आदल्या दिवशीच शाळेने केले होती.मॅडमने स्वतःची अशी सुंदर सुंदर घोषवाक्य सुद्धा मुलांना लिहून दिली होती. मुलांनी ती अतिशय छान अशा पद्धतीने पाठांतर करून त्याच्या पाट्या सुध्दा तयार करून आणल्या होता.
ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबर या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, माता पालक यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली. सर्व विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी टोपले, खोरे,खराटे बकेटा, आणल्या होत्या.सकाळी ठीक दहा वाजता शाळेच्या परिसरापासून स्वच्छतेला सुरुवात झाली तिथून पुढे मुख्य रस्ता, ढेकणमोहा बाजारतळ, मंदिर परिसर, ग्रामपंचायत परिसर, सर्वांनी स्वच्छ करून आपले स्वतःचे मोलाचे योगदान दिले. मुलांनी आपला गाव स्वच्छ ठेवू, रोगराई मुक्त होऊ... नको प्लास्टिक नको घाण, आपला परिसर ठेवू छान..आम्ही मुले सांगतो ऐका, कचरा कोणी करू नका.. आमचा आहे एकच नारा, स्वच्छ ठेवू गाव सारा.. विडी,तंबाखू नका खाऊ, व्यसनमुक्त आपण होऊ ..अशा घोषवाक्यांची फलक घेऊन मोठमोठ्याने घोषणा देत ठरवलेल्या ठिकाणी जाऊन कचरा जमा करून तो कचरा जाळण्यात आला. यामुळे शाळेचा, बाजार तळाचा, ग्रामपंचायतीचा आणि मुख्य रस्त्यालगतचा सर्व परिसर अगदी स्वच्छ झालेला दिसून येत होता. विद्यार्थ्यांचा हा अनोखा उपक्रम पाहून येणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा त्याविषयी कुतूहल वाटत होते. प्रत्येक जण या उपक्रमाविषयी विचारणा करत होता. त्यामुळे सर्व परिसरामध्ये जिल्हा परिषद शाळेविषयी एक उपक्रमशील शाळा म्हणून आदराने पाहिले जाते.
बीड तालुक्यातील, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेमध्ये असे नाविन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात. म्हणून या शाळेची ख्याती पंचक्रोशी मध्ये 'उपक्रमशील शाळा' म्हणून केली जाते. तसाच आजचा हा 'एक पाऊल स्वच्छतेकडे' हा उपक्रम सुद्धा एक अनोखाच उपक्रम शाळेने राबवला.
हा उपक्रम राबविण्यामागे ज्याप्रमाणे बाल वयातच मुलांच्या मनामध्ये अनेक मूल्य जर रुजवले तर ते कायम चिरकाल टिकतात आणि मुलांचे व्यक्तिमत्व तसे घडत जाते. तसेच अनेकविध मूल्यांपैकी श्रम प्रतिष्ठा हे एक महत्त्वाचे मूल्य म्हणजे आपण स्वतःचे काम स्वतः करावे किंवा कोणत्याही कामाची मनात लाज न बाळगता ते अगदी मनापासून करावे, ही भावना जर बालवयात मुलांच्या मनावर कोरली गेली, तर निश्चितच मुलांना भविष्यामध्ये श्रम करण्याची वृत्ती कामे येते. निश्चितच मुलं ही स्वावलंबी बनतात. एवढेच काय तर परिसर स्वच्छतेमुळे निश्चितच मुलांना स्वच्छतेविषयी मनामध्ये जाणीव निर्माण होते, एवढेच काय तर फक्त आपल्या स्वतःच्या स्वच्छतेबरोबरच आपला परिसर, आपला गाव हा सुद्धा स्वच्छ असला पाहिजे,ज्यामुळे आपणच आपल्याला होणाऱ्या रोगापासून वाचू शकतो हा संस्कार सुद्धा यामुळे बालमनावर कोरला जातो आणि हा संस्कार या जिल्हा परिषदेत शाळेकडून अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रुजवला जात आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ, माता पालक,नागरिक सुद्धा अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होतात.
एक तास श्रमदान आजच्या या अनोख्या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम, शिक्षिका जायभाय मॅडम, ट्रेनी शिक्षक गाडीवान सर, माता पालक अश्विनीताई गोरे, रोहिणीताई देवकते, सुनिता देवकते, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सिद्धेश्वर भोगे, उपाध्यक्ष उमेश देवकते आणि समस्त ढेकणमोहा गावकरी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल शाळेचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
शब्दांकन
उषा बप्पासाहेब ढेरे/करपे
मुख्याध्यापिका
प्रा. शा. ढेकणमोहा,बीड