ढेकणमोहा शाळेत साजरी झाली.. पर्यावरण पूरक राखीपौर्णिमा..

झाडांना राखी बांधून,पौर्णिमा साजरी

” सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती,
ओवाळीते भाऊराया
वेड्या बहिणीची वेडी रे माया”
हे गीत गुणगुणत आज मी शाळेकडे निघाले होते.अर्थातच आज आमचा अनोखा रक्षाबंधन शाळेत साजरा होणार होता.

  दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामधील महत्त्वाच्या आणि भावा- बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे 'रक्षाबंधन'. त्याच दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा असते. भारतीय परंपरेनुसार आपल्या देशामध्ये घरोघरी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर तिची साथ देऊन संकटात तिचे रक्षण करण्याचं वचन देत असतो.अगदी सासरी गेलेली बहीण सुद्धा या राखी पौर्णिमा सणाला भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येत असते. पूर्वीच्या काळी सासरी गेलेली बहीण श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या सणाला माहेरी यायची ती परत सासरी भावाला राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करूनच परत जायची, कारण वर्षभर पुन्हा माहेरी यायला जमायचं नाही. आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये माहेरी जाता नाही आलं तरी सुद्धा भाऊ कुठेही असला तरीही या सणासाठी बहिणीकडे राखी बांधून घेण्यासाठी हमखास येतोच. तो दिवस बहिणीसाठी अगदी सर्वात जास्त आनंदाचा दिवस असतो.

 
                  जसा घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो तसा माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा  या शाळेमध्ये  मी 2018 साली रुजू झाले.तेव्हापासून हा सण मी शाळेमध्ये झाडांना राखी बांधून साजरा करण्याची प्रथा सुरू केली ती आजतागायत. शाळेमध्ये या सणासाठी मुलांमध्ये सुद्धा वेगळाच उत्साह संचारलेला असतो आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी असणाऱ्या राखी पौर्णिमेसाठी मुली राख्या आणण्यासाठी उत्सुक असतात, तर मुलं त्यांना काय गिफ्ट द्यावं ?या विचारात असतात. मग प्रत्येक जणांची लगबग सुरू होते ती राख्या आणि गिफ्ट घेण्यासाठी. मुली छान छान राख्या घेऊन येतात, तर मुलं त्यांना देण्यासाठी छान छान त्यांना आवडेल असं गिफ्ट घेऊन येतात. अगदी आनंदमय असं वातावरण शाळेमध्ये होऊन जातं.अगदी तसंच याही वर्षी २० ऑगस्ट २०२४ रोजी राखी पौर्णिमा शाळेत साजरी करण्याचे ठरवलं. ठरवल्याप्रमाणे सर्व नियोजन झाले आणि सर्व मुलींनी राख्या आणि मुलांनी देखील त्यांना देण्यासाठी गिफ्ट आणलं. ओवाळणीचं ताट सुद्धा मुली छान सजवून घेऊन आल्या होत्या. गोलाकार असे रचनेमध्ये मुलांना आणि मुलींना बसवून प्रत्येक मुलीने मुलांना छान आनंदाने राखी बांधली आणि वेगवेगळ्या स्वरूपातील गिफ्ट मुलांनी सुद्धा राखी बांधणाऱ्या बहिणींना दिली.ही चिमुकली हा सण जेव्हा साजरा करत होती तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडे दिसत होता. यथावकाश राखी बांधून झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी म्हणजे सलग सहाव्या वर्षी आम्ही आज आम्ही लावलेल्या झाडांना सुद्धा राखी बांधणार होतो. या शाळेत रुजू झाल्यापासून मी माझे दोन विशेष उपक्रम सुरू केले. एक म्हणजे दरवर्षी कृषी दिनानिमित्त म्हणजेच एक जुलै रोजी या दिवशी लावलेल्या झाडांचा दरवर्षी वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करणे आणि त्याच झाडांना पुन्हा राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधून त्यांच्या ऋणातून काहीसं मुक्त होणे.

                मुलांनाही या दोन्हीही वेगळ्या उपक्रमाबद्दल खूप उत्सुकता असते कारण आजूबाजूच्या परिसरात आमच्याकडेच हे दोन सण प्रामुख्याने साजरे झालेले दिसून येतात. त्यामुळे निश्चितच मुलांमध्ये आणि मुलांमार्फत गावांमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये 'एक झाडे लावा झाडे जगवा' असा हा वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या संदर्भात संदेश नकळत पसरतो. जो या पृथ्वीतलावर मानवासाठी वरदानच आहे. मग सर्वांनी झाडासाठी राखून ठेवलेल्या राख्या घेऊन सुरुवातीला शाळेत असलेला वटवृक्ष म्हणजे आमचा वडदादा त्याला राखी बांधून या झाडांना राखी बांधण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर पुढे जांभूळ, अशोक, बदाम,नांदुरकी, करंजी, जास्वंद अशा वेगवेगळ्या झाडांना आणि फुलझाडांना राख्या बांधल्या. अगदी छान झाड सुद्धा आनंदाने आज प्रसन्न दिसत होते.
                खरंच आयुष्यभर आपल्याला जे झाड जगण्यासाठी ऑक्सिजन देतं.वेळप्रसंगी थकल्या भागलेल्यांना, दमून आलेल्यांना, उन्हाची चटके सोसलेल्यांना गार गार सावली देतं.फळे, फुले आणि बरच काही तिथं अशा झाडांना राख्या बांधणं म्हणजे त्यांच्या ऋणातून काहीसं मुक्त होणे. या दिवशी ही झाड अगदी आनंदाने डोलताना दिसत होती आणि पुन्हा आम्ही आयुष्यभर गार- गार छाया धरून गोड -गोड फळे खायला देणार हेच जणू सांगत होती.
                   यश श्रावण महिन्यामध्ये हे झाड तर जास्तच भरली होती. परंतु आज त्यांच्या सुद्धा फांद्या फांद्यावर रंगीबिरंगी राख्यांनी फेर धरला होता जणू असेच वाटत होते. राख्या बांधत असतानाच मी लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी  ही झाडांना राखी बांधण्याची परंपरा, प्रथा सुरू केली. त्यावेळेस ऐसा घडवू बालक या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहातील मी माझं "अनोखे रक्षाबंधन" हे स्वतःचं गीत या झाडांसाठी रचलं आणि ते हे गीत माझ्या चालीसह मुलांकडून वदवून देखील घेतलं. तेच गीत आज मी पुन्हा नव्याने नव्या विद्यार्थ्यांना सांगत होते, गाऊन दाखवत होते आणि मुलंही अगदी आनंदाने डोलत डोलत हे गीत गात गात झाडांना राख्या बांधत होती. या गीतामध्ये वडदादा, जांभुळ दादा, अशोक दादा, बदाम दादा असा उल्लेख या वृक्षांचा केला होता. त्यामुळे मुलांना या झाडांबद्दल ही सर्व झाडे आमचे मोठे भाऊच आहेत असे वाटत होते आणि तेवढीच आपुलकीने हे गीत मुले गात होती. झाडं सुद्धा हे गीत ऐकत ऐकत मुलांना छान प्रतिसाद देत होती. असा हा आमचा राखी पौर्णिमेचा सण अगदी आगळावेगळा पर्यावरण पूरक आणि समाजामध्ये एक सकारात्मक संदेश देणारा ठरला.

शब्दांकन/ स्वानुभव
श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे
मुख्याध्यापिका,
जि.प.प्रा.शा.ढेकणमोहा,
ता.जि.बीड

6 thoughts on “ढेकणमोहा शाळेत साजरी झाली.. पर्यावरण पूरक राखीपौर्णिमा..”

  1. खूप छान आजच्या आधुनिक युगामध्ये नैतिक मूल्य कमी होत चालले आहेत त्यासाठी मूल्याची जोपासना व्हावी म्हणून हिंदू धर्मातील अनेक सणांचे महत्त्व शाळेतून विद्यार्थ्यांना बिंबवणे खूप महत्त्वाचे आहे

    Reply

Leave a Comment