बंधनापलीकडील.. अनोखे रक्षाबंधन..

एक अनोखे रक्षाबंधन…

श्रावण महिन्यातील भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.या सणादिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला आपल्या प्रेमाचा धागा म्हणून राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर बहिणीची साथ देऊन संकटात नेहमी रक्षण करण्याचं वचन देत असतो. आपल्या देशात घरोघरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सासरी असलेली बहीण, भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येते.तिला भावाला भेटण्याची आणि राखी बांधण्याची जणू काही घाईच झालेली असते.

पूर्वीच्या काळी तर एकदा बहीण नागपंचमीला माहेरी आली की, ती राखीपौर्णिमा झाल्यानंतरच सासरी परत जायची. आता काळ बदलला आहे. या धावपळीच्या युगामध्ये आपल्या व्यवसाय निमित्ताने, नोकरी निमित्ताने तितकेसे माहेरी जाणे होत नाही किंवा मुक्कामी सुद्धा राहणे होत नाही. परंतु तरीदेखील कितीही घाई असेल तरीसुद्धा बहीण मात्र भावाला राखी बांधल्याशिवाय राहूच शकत नाही. कित्येक दिवसापासून या सणाची अनामिक ओढ प्रत्येक बहिणीला मनाला लागून राहिलेली असते आणि ती पूर्ण होते ती या सणानेच.

आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आजची माझी ही राखी पौर्णिमा अगदी अनोख्या पद्धतीने साजरी झाली. रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन तर्फे जिल्हा कारागृह बीड येथे रक्षाबंधन सण साजरा करण्याचे ठरले होते. त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष आदरणीय रो.नितीनजी गोपन सर आणि सचिव रो.डॉक्टर निलेशजी जगदाळे सर यांनी Anns आणि आणि लेडीज Rotariyans यांना जिल्हा कारागृह, बीड येथील रक्षाबंधन कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती.तशी अगोदरच नावेही कळवली होती.

ठरल्याप्रमाणे आज सकाळी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष रो.गोपन सर, रो.जगदाळे सर आणि आम्ही सर्वजणी असे एकूण 12 जण जिल्हा कारागृहामध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी गेलो.आज प्रथमच कारागृह म्हणजे जेल मी पाहणार होते. पोस्ट वाचल्यापासूनच मनामध्ये थोडी उत्सुकता होती आणि मन थोडे संवेदनशील ही झाले होते परंतु हे एक पूर्वजन्मीचे ऋणानुबंध कुठेतरी असावेत आणि म्हणून अशी संधी आपल्याला मिळाली असावी असं मनोमन वाटत होतं. सकाळी दहा वाजता आम्ही सर्वजणी कारागृहाकडे रवाना झालो.मेन गेटमधून आतमध्ये प्रवेश करतानाच काही वेगळ्या भावना मनामध्ये येत होत्या. मनाच्या एका कोपऱ्यात भीतीही वाटत होती.आजूबाजूला पाहतच थेट कारागृहाच्या मेन गेट जवळ आम्ही पोहोचलो. आजूबाजूला पाहिलं तर आज रक्षाबंधनानिमित्त, सणानिमित्त बरीच मंडळी बाहेर जमलेली दिसत होती. बऱ्यापैकी नाराजीचा सूर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. हे पाहून मनामध्ये नानाविध विचार येऊन गेले. मन खूप हळवे झाले होते. रो.गोपन सर आणि रो.जगदाळे सर तेथील गेट जवळ आतमध्ये जाण्यासंदर्भात बोलत होते. बाजूलाच मुलाखत कक्ष होता. तिथे असणारे पोलीस बांधव एकाचे नाव घेऊन त्या त्या व्यक्तीला मुलाखत कक्षामध्ये त्यांच्या संबंधित कैद्याला भेटण्यासाठी बोलावत होते. थोडा वेळ झालं की, पुढील नाव ते पुकारत होते. असंच हा क्रम पुढे चालू होता.हे पाहत असतानाच सिनेमांमध्ये पहावं आणि आज तेच,नव्हे त्याहूनही काहीतरी वेगळंच जाणावं असं दिसत होतं. मन खूपच भावनिक झालं होतं. खूप वाईट वाटत होतं कारण प्रत्येक बहीण ही डोळे पुसत, मुलाखत कक्षामध्ये जात होती आणि आतून बाहेर येताना डोळे पुसत पुसत मागे वळून पाहत पाहात पुढे चालत होती. तिची पावले जड वाटत होती. मनाला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. आज मी अशा व्यक्तींना राखी बांधण्यासाठी आले होते, ज्यांना त्यांच्या बहिणीकडे आज राखी बांधण्यासाठी जाता येत नव्हते.त्यांची आज मी बहीण झाले होते. माणसातल माणूसपण जपण्याची ही एक नवी संधीच जणू आज मिळाली होती.

सरांनी सांगितल्यानंतर आम्ही सर्वजणी आमची ओवाळण्याची ताटं घेऊन मुख्य दरवाजातून आतमध्ये गेलो. वेगळ्याच भावना मनामध्ये दाटून येत होत्या. वाईट वाटत होतं. नानाविध विचार मनपटलावर उमटत होती. आजपर्यंत सिनेमात पाहिलेला जेल, कारागृह आज प्रत्यक्षात तिथे येण्याचा योग आला होता. आतमध्ये गेल्यानंतर तिथे सर्व जवळपास 100 ते 200 कैदी एका रांगेमध्ये ओळीत बसलेले दिसले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसत होते. तिथे गेल्यानंतर जसे आम्ही सर्वांकडे पहात होतो तसेच आमच्याकडे सुद्धा प्रत्येक जण उत्सुकतेने पाहत होता.

तिथे आमची बसण्याची सोय केल्यानंतर यथावकाश सर्व कैदी बांधवांना व्यवस्थित बसवून घेतले. प्रत्येकाच्या हालचाली या वेगवेगळ्या वाटत होत्या. त्यानंतर तेथील तुरुंगाधिकारी यांनी कार्यक्रमाबद्दल थोडीशी कल्पना,माहिती तेथील उपस्थिताना दिली.आमच्याबरोबरच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथील दीदी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी येथे आलेल्या होत्या. कार्यक्रमाचा उद्देश सांगून झाल्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी येथील दीदींनी आपण जीवनात येऊन काय केलं पाहिजे? म्हणजे आपला आयुष्य सुखकर होईल,याविषयी सविस्तर छान असं कैद्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या जीवनात सुखी राहायचं असेल तर आपल्या अंगी असणारे सहा विकार कसे काढून टाकावेत आणि परमेश्वराच्या चरणी कसं लिन व्हावं? म्हणजे आपल्याला सुखकर असं आयुष्य जगता येतं.याविषयी छान माहिती दिली. हे सर्व ऐकून बरेच कैदी बांधव भाऊक झालेले दिसत होते खरोखर जीवन कशाला म्हणतात किंवा ते कसं असलं पाहिजे सुंदर जीवन जगणं हे आपल्याच हातात आहे हे जणू काही बऱ्याच जणांना कळत होत. समोर बसलेल्या कैदी बांधवांमधील एक कैदी बांधव बसल्यापासून खाली मान घालून बसले होते आणि सारखे रडत होते डोळे पुसत होते. त्यांच्या मनात नक्कीच भावना दाटून आल्या होत्या.कदाचित त्यांच्या बहिणीची आठवण त्यांना आज आली असावी. हे सर्व मन हेलावून टाकणारे वातावरण अगदी संवेदनशील मनाला व्याकुळ न करेल तर नवलच!! नकळतपणे आमच्याही डोळ्यांमधून अश्रू येत होते. भावना अनावर झाल्या होत्या. नानाविध विचारांनी मनामध्ये काहूर उठले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारे भाव पाहून खरंच हे सर्वच गुन्हेगार असतील का? हा विचार मनात क्षणभर येऊन गेला. आज तेथील कैदी बांधव त्यांच्या बहिणींच्या आठवणीने व्याकुळ झालेले असावेत म्हणूनच की काय आज आम्ही तिथे पोहोचलो होतो असेच म्हणावे लागेल. पूर्वजन्मीची काही ऋणानुबंध असावीत म्हणून आम्हाला कैदी बांधवांना राखी बांधण्याचा आज अनोखा योग आला होता.

त्यानंतर रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउनचे अध्यक्ष आदरणीय रो. नितिनजी गोपन सर यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले आपल्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला आणि त्यानंतर तेथील नियोजन प्रमाणे उपस्थित कैदी बांधवांना एका नंतर एक याप्रमाणे प्रत्येकीने ओवाळून राखी बांधण्यास सुरुवात झाली. जवळपास राखी बांधण्याचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम दोन तास चालला. अगदी मन हे लावून टाकणारा.बसल्यापासून खाली मान घालून सातत्याने रडत असणाऱ्या त्या कैदी बांधवाला राखी बांधण्याचा मला योग आला. खूप समाधान वाटले. कदाचित त्यांची बहीण जरी त्यांना प्रत्यक्षात भेटली नसेल तरीही या राखीच्या बंधनातून, या राखीच्या धाग्यामधून तिच्यापर्यंत या भावना नक्कीच काही प्रमाणात का होईना पोहोचवण्याचे भाग्य मला मिळाले असे वाटले. त्यांच्या बहिणीची जागा जरी आपण आज घेऊ शकलो नसलो तरी सुद्धा आजचा हा राखीचा धागा सुद्धा एका बहिणीनेच आपल्या मनगटावर बांधला आहे हे कायम नक्कीच त्यांच्या स्मरणात राहील. सर्व कैदी बांधवांना राख्या बांधून झाल्यानंतर तेथील पोलीस बांधवांना सुध्दा आम्ही राख्या बांधल्या.मनाला खूप समाधान वाटले बंधनापलीकडचे हे रक्षाबंधन आज आम्ही सर्वजण साजरे करत होतो. आणलेला केळीचा खाऊ त्यांना वाटप करण्यात आला. कारागृहात जाताना आपली कोणतीही वस्तू आतमध्ये नेण्याची परवानगी नसल्यामुळे अर्थातच मोबाईल आमच्याकडे नव्हता. तेथील पोलीस बांधवांनीच त्यांच्या ऑफिस मधील मोबाईल मध्ये सर्व हा कार्यक्रम कैद केला होता. कैदी बांधवांनाच नाही तर आम्ही पुढे कैदी भगिनींना सुद्धा ओवाळून राख्या बांधल्या. तिथेही थोडं मार्गदर्शन करण्यात आलं. सर्व कार्यक्रम आटोपून जेव्हा कारागृहाच्या मेन गेट कडे आम्ही निघालो तेव्हा मन अगदी ओझ्यानं जड झाल्यासारखं वाटत होतं. आज रक्षाबंधन हा सण नेहमीपेक्षा वेगळाच असा वाटत होता. आमची सर्वांचे बंधू नोकरी,व्यवसाय निमित्त लांब होते, परंतु आजच्या या रक्षाबंधनाला या कैदी बांधवांना सकाळीच राख्या बांधून हा अनोखा रक्षाबंधन आम्ही साजरा केला होता. याचा मनाला खूपच आनंद वाटत होता. आजचा हा सण आयुष्यात काहीतरी वेगळच देऊन गेला होता.

नक्कीच हा सण बंधनापलीकडील बंध जोडणारा हा साजरा झाला होता. आजचा हा जिल्हा कारागृह,बीड येथे साजरा केलेला रक्षाबंधन सण नक्कीच कायम स्मरणात राहणारा असाच ठरला.

बीड जिल्हा कारागृहातील बंदी व कर्मचारी यांचे करिता रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन तर्फे कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी रो. सौ. अनिता शिंदे, रो.सौ. उषा ढेरे, रो. सौ. संगीता मनसबदार, सौ. वर्षा थोरात,सौ. मनिषा देशमाने, सौ.सोनिका जगदाळे, सौ.प्रज्वला गोपन यांनी बंदी बांधवाना राखी बांधली यावेळी कारागृह अधीक्षक श्री.शेख साहेब, सुभेदार श्री.चिंचाणे, कारागृह कर्मचारी श्री.टी एल पवार व डोईफोडे, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे अध्यक्ष. रो. इंजि. नितीन गोपन, सचिव. रो. डॉ. निलेश जगदाळे, रो. डॉ. शिवाजी देशमाने, रो. प्रा.नितीन भोसले व कारागृह कर्मचारी उपस्थित होते.

शेवटी येताना मनोमन ईश्वराला एकच प्रार्थना केली:-

“तू बुध्दी दे,तू तेज दे,नवंचेतना,विश्वास देजे सत्य सुंदर सर्वथाआजन्म त्याचा ध्यास दे,तू बुध्दी दे……..”

शब्दांकन,स्वानुभव

श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे

मुख्याध्यापिका,

प्रा.शा.ढेकणमोहा,बीड

मोबाईल -9420025078

13 thoughts on “बंधनापलीकडील.. अनोखे रक्षाबंधन..”

  1. माणसाने आयुष्यात किती संपत्ती, पैसा कमावला, किती वैभव कमावले याला महत्व नसून आयुष्याच्या शेवटी बेरीज वजाबाकी होते – ती म्हणजे माणसाने केलेल्या चांगल्या- वाईट कामांची. जेव्हा माणूस ‘माणूस’ म्हणून जगतो आणि समोरच्या व्यक्तीला ‘माणूस’ म्हणूनच पाहतो माणुसकीचं आणि खऱ्या माणसाचं दर्शन होत असतं. तेव्हा सर्व भौतिक, दिखाऊ, ऐहिक सुख, यासारख्या बाबी गळून पडतात.
    वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे संत गाडगेबाबा यांनीही माणसांमध्येच देव असतो असे सांगितले. ते आपल्या किर्तनात जनतेला जाहीरपणे विचारायचे की, “कारेऽऽऽ तुमचा देव कुठी राह्यते? लोक म्हणायचे, ‘देवळात राहायचे.’ बाबा म्हणायचे, “असं काय … तुमचा देव देवळात राह्यते.” लोक विचारायचे, ‘काऊन बाबा?’ तेंव्हा गाडगेबाबा म्हणायचे, ” नायी, माह्या देव माह्या मनात राह्यते. माह्या देव माणसात दिसते. भुकेल्याला अन्न द्यावे, तहाणल्याला पाणी, अडल्या नाडल्याला मदत करावी, रोग्याची सेवा करावी, अन् त्यायच्यातच देव पहावा.”
    माणसात देव राहते असे सांगणारे गाडगेबाबा यांच्या कृतीला साजेसं हे उदाहरण आहे.
    आपल्या आयुष्यात केलेल्या चुकीमुळे म्हणा किंवा गुन्ह्यामूळे शिक्षा भोगत असलेले कैदी, हे सुद्धा माणसेच. त्यांनाही एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे पण मा. न्यायालयाच्या आदेशानुसार. अशाही चार भिंतींच्या आत आपले आयुष्य जगणारे व कैदी म्हणून सजा मिळालेल्या माणसांना माणुसकीच्या चष्म्यातून पाहत त्यांच्या रुक्ष आयुष्यात आनंदाचे क्षण घेवून आपण गेलात. आपण त्याच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केलात.
    रक्षाबंधननानिमित्त आपण त्यांना बहिण – भावाच्या पवित्र नात्यांमध्ये सहभागी करून घेतले. आपण सर्वांनी परवानगीसह नियमानुसार कारागृहात जाऊन या भावंडांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. जगात यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही. आनंद स्वतः वा एकट्याने उपभोगण्यापेक्षा इतरांना आनंद वाटणे, जे आपले नाहीत अश्या परक्यांच्याही आयुष्यात आपण आनंद निर्माण करून स्वतः आनंद घेणे ह्यासारखे सुख नाही. त्यामुळे आपल्या या कार्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशीच सद्बुद्धी सर्वांना लाभो, हिच अपेक्षा.
    आपण एक शिक्षिका म्हणून तर आदर्श आहातच पण एक व्यक्ती म्हणूनही समाजामध्ये आपले कार्य आणि सामाजिक बांधीलकी ही अनुकरणीय प्रेरणादायी आहे. त्यामुळे आपणास व आपल्या संपुर्ण टीमला खूप खूप सदिच्छा.

    Reply
    • निलेश सर आपण खरच मनापासून आमच्या कार्याला कौतुकाची थाप दिलीत.खूप आनंद वाटला.मनापासून खूप खूप धन्यवाद

      Reply
    • मॅडम ,आपल्या सोबत सर्व महिला भगिनींच्या कार्यामुळे आम्हाला अभिमान वाटला 🙏✅
      “पुसणारे कोणी असतील, तर डोळे भरून येण्यास अर्थ आहे.नाहीतर मरणही व्यर्थ आहे.
      मॅडम,खूप छान वास्तव लेखन केलं.

      Reply
    • सचिन राठोड सर,आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद

      Reply
  2. अप्रतिम लेखन केले मॅडम.
    तुम्ही सर्वगुण संपन्न आहात..भाऊ बहीणींच्या नात्याला तुम्ही शब्दसुमनांनी सजवलात..
    पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐

    Reply
  3. क्षितिजापलीकडील व विश्वाला गवसनी घालणारे विचार वाचून मन आनंदाने हेलावून गेले.

    Reply
  4. बहीण भावाच्या हळव्या प्रेमाची गुंफण वाचून फार आनंद झाला.

    Reply
  5. आदरणीय सर उषा ढेरे मॅडम अतिशय सुरेख मन हे लावणारे सद्गतीत करणारे सत्य विवेचन आपण बंधनापलीकडचे बंधन या सदरात केलेले आहे
    कालचा रक्षाबंधनाचा सण अतिशय अस्मरणीय असल्याचे जाणीव झाली बहिण भावाचे प्रेमळ व अतूट असे नाते काय असते याची जाणीव सर्वांना झाली त्याचे सुरेख शब्दांकन आपण केलेत ते देखील म्हणाला भावून गेले अशाच प्रकारचा कौटुंबिक जिव्हाळा ऋणानुबंध कायम जपण्याचा संकल्प या शुभ दिनी आपण सर्व रोटरियन्स करूयात
    पुनश्च: एकदा रोटरी क्लब ऑफ बीड टाऊन चे पदाधिकारी सर्व रोटरियन्स यांचे धन्यवाद आभार त्यांनी आयुष्यातील अस्मरणीय असा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली

    Reply
  6. आदरणीय सर उषा ढेरे मॅडम अतिशय सुरेख मन हे लावणारे सद्गतीत करणारे सत्य विवेचन आपण बंधनापलीकडचे बंधन या सदरात केलेले आहे
    कालचा रक्षाबंधनाचा सण अतिशय अस्मरणीय असल्याचे जाणीव झाली बहिण भावाचे प्रेमळ व अतूट असे नाते काय असते याची जाणीव सर्वांना झाली त्याचे सुरेख शब्दांकन आपण केलेत ते देखील म्हणाला भावून गेले अशाच प्रकारचा कौटुंबिक जिव्हाळा ऋणानुबंध कायम जपण्याचा संकल्प या शुभ दिनी आपण सर्व रोटरियन्स करूयात
    पुनश्च: एकदा रोटरी क्लब ऑफ बीड टाऊन चे पदाधिकारी सर्व रोटरियन्स यांचे धन्यवाद आभार त्यांनी आयुष्यातील अस्मरणीय असा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली

    Reply

Leave a Comment