एकेकाळी ऑक्सिजनवर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेने आज एक नवा इतिहास रचला आहे. सहा वर्षांपूर्वी पहिली ते चौथी वर्गाची एकूण पटसंख्या नाममात्र असणारी ही जिल्हा परिषदेची बीड जिल्ह्यातील शाळा. या शाळेमध्ये चार वर्गाचे एकूण फक्त पाच ते सात विद्यार्थी होते. पुढे पुढे जसजसे शाळेमध्ये विविध उपक्रम होऊ लागले तसतशी दरवर्षी शाळेची विद्यार्थी संख्या वाढतच गेली. फक्त संख्याच वाढली नाही तर त्याबरोबरच गुणवत्ता देखील वाढली शाळेचा गुणवत्तेचा आलेख गेल्या सहा वर्षापासून कायम वाढतच आहे. त्यामुळेच शेजारच्या गावावरून देखील माझ्या ढेकणमोहा जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी येत आहेत. गेल्या तीन वर्षापासून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एम टी एस, बी टी एस यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी बसवले जाते.फक्त बसवले जात नाही तर त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेरे मॅडम आणि शिक्षिका सुनीता जायभाये मॅडम या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. बालवयापासूनच या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी त्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे.
आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकून राहावा, त्याची बौद्धिक पातळी वाढावी आणि त्याचं समाजामध्ये एक आगळ वेगळं स्थान निर्माण व्हावं यासाठी या शाळेने मागील तीन वर्षापासून सातत्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देऊन एका अर्थाने त्यांना या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सक्षम बनवले आहे. बीड सारख्या शहरांमध्ये येऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे हे माझे विद्यार्थी अगदी आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जातात.एवढेच काय मागील दोन्ही वर्षी MTS परीक्षेमध्ये सेंटर मधून पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान देखील माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे.त्यांचा सन्मानही झाला आहे.
शाळेमध्ये क्रमिक पुस्तकातील घटक अगदी आनंददायी पद्धतीने, हसतखेळत पद्धतीने, वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच पूर्ण केले जाते आणि त्यानंतर सुरू होते ती स्पर्धा परीक्षेची तयारी!!!!! मुलही अगदी या प्रत्येक उपक्रमामध्ये तितक्याच हिरीरीने सहभागी होतात आणि त्यामधील घटक संकल्पना अवगत करतात अशा वेगवेगळ्या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेची ढेकणमोहा शाळा ही आज बीड जिल्ह्यामधील उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास आलेली आहे. वेगवेगळे उपक्रम सातत्याने शाळा राबवत असते. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या आणि गुणवत्ता ही मागील सहा वर्षापासून कायम टिकून आहे नव्हे त्यामध्ये भरत पडत आहे.
यावर्षी म्हणजे 2024 25 साठी इयत्ता दुसरी ९, तिसरी १५ आणि चौथी १६ वर्गाची मिळून एकूण ४० विद्यार्थी बीटीएस स्पर्धा परीक्षेसाठी बसली होती. त्यातील तब्बल ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यासाठी तशी तयारीही शाळेमध्ये घेतली जात होती. विद्यार्थी सराव पेपर अगदी आनंदाने सोडवत होती. एवढेच काय परीक्षेची वाट देखील बघत होती. तो दिवस उजाडला आणि विद्यार्थ्यांनी बी टी एस ची ही स्पर्धा परीक्षा दिलेल्या पार केली. कौतुक या गोष्टीचा वाटत होतं की माझी चिमुकली शहरांमधील शाळेमध्ये येऊन अगदी उड्या मारत परीक्षेसाठी सामोरे जात होती त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास त्यांचे यश दाखवणार होता थोडीशी भीती जरी वाटत असली तरी देखील मनातील आत्मविश्वास तिला वर येऊ देत नव्हता. केलेल्या तयारीच्या जोरावर परीक्षेतील पेपर सुद्धा अगदी विद्यार्थ्यांनी सहज सोडवला आणि आनंदाने बाहेर आली. एकेक दिवस जात होता तसतसे विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते. आणि आज निकालाची लिंक करतात त्यावर सर्व विद्यार्थ्यांचे निकाल पत्रक पाहून मन अगदी हरकून गेले केलेल्या कष्टाची चीज झाले असे मनोमन सांगत होते.
ज्या शाळेमध्ये एकेकाळी बसण्यासाठी विद्यार्थीच नव्हते अशा शाळेत आज एकूण ८१ विदयार्थी आनंददायी पद्धतीने शिकतात आणि शाळेच्या एकूण ५०% विद्यार्थ्यानी BTS स्पर्धा परीक्षा देवून माध्यमातून एक नवा इतिहास रचला. यशस्वी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका यांचे ढेकणमोहा पंचक्रोशीत कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव देखील होत आहे.
