“सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय..?”
गीताच्या ओळी ऐकून आपण हरकून गेलात. हो,अगदी हरकून जाण्यासारखंच हे गीत आहे. प्रत्येकानं हे पावसाचं गाणं शाळेमध्ये गायलेलं आणि अगदीच पावसामध्ये नाचून सुद्धा त्याचा आनंद घेतलेला आहे. हा…. पण आपल्या पिढीनं..हो,खरच आपल्या बालपणी कोणत्याच गोष्टी दडपणाखाली होत नव्हत्या,होत्या त्या फक्त आनंदाने…..त्या काळात खूप छान रमतगमत,वाटेल तेंव्हा शाळेत जायचं, नाही जावंसं वाटलं की घरी राहायचं, घरी राहिलं तरी कोणाचा अभ्यासाचा धाक नसायचा,असायचं ते फक्त मनसोक्त हूंदडनं….मनमुराद खेळणं आणि खाण.खरच फक्त त्या गोड आठवणी आठवल्या तरीही मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. गेलात ना आपणही भूतकाळामध्ये.. आपल्या बालपणीच्या काळात आणि हो, हे सगळं आठवलं की आपोआपच ‘बालपणीचा काळ सुखाचा’ हे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात.
हे सगळं आठवण्याचं कारणही तसच आहे.आज आपण आजूबाजूला पाहत आहोत, लहान मूल म्हणजे अगदीच दीड ते दोन वर्षापासूनच त्याला शिकण्यासाठी दडपण दिले जातय. म्हणजे अगदीच प्लेग्रुप,नर्सरी,एल के जी,यु के जी आणि मग नंतर सुरू होतं ते फर्स्ट स्टॅंडर्ड, सेकंड स्टॅंडर्ड किंवा पहिली, दुसरी. आपलं बालपण जरा आपण पुन्हा एकदा आठवूयात आणि जरा डोकावून पाहूयात. आपण कितव्या वर्षी शाळेत गेलो होतो बरं… हा… अगदी डावा हात उजव्या कानाला लागला आणि उजवा हात डाव्या कानाला लागला की,आपण पहिलीत जायचो. किंवा त्याही पुढे जाऊन तरीही एखादं मुल शाळेत नाही बसलं, रडत असेल किंवा ते जायचं नको म्हणत असेल तरीही त्याला जबरदस्ती न करता आज नाही गेला तर तो उद्या शाळेत जाईल,असं घरची मंडळी त्याला समजून घेत.त्याच्या मानसिकतेचा विचार करून मग त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो अगदी स्वतःहून हसत खेळत,उड्या मारत आजी-आजोबासोबत हाताला धरून शाळेत जात असे तो नेहमीसाठी….
आज आपण पाहत आहोत, याउलट आपल्याला काहीसं चित्र दिसत आहे. भल्या सकाळीच लेकराला झोपमोड करून उठवलं जातं त्याची इच्छा नसेल तरीही,नसतेच मुळी.कारण लहान मुलांना झोप मोठ्यांच्या तुलनेत जास्तच हवी असते.मग साहजिकच त्याचं वय लहान असल्यामुळे,त्याचं शरीर आणि मन कुठेतरी बांधून घेण्यासाठी तयार नसल्यामुळे तो शरीरानेही आणि मनानेही तयार नसतो. तरीही त्याला घरातील मंडळी शक्यतो आई किंवा बाबा हे अगदीच बालवयात म्हणजेच जेमतेम दोन वर्ष होतात तरच हे वरील सर्व सुरू होतं. मग हे मुलं शेवटी ते बळच कसंतरी,झोपमोड होऊन, मनात इच्छा नसतानाही उठणं,मग त्याच्या कोणत्याही नैसर्गिक क्रिया सकाळी पार न पडता, त्याला घाई गडबडीत आवरून डबा, बॉटल, सॉक्स,श्युज,युनिफॉर्म,टाय, बेल्ट, दप्तर आणि त्याला हवं-नको असलेले साहित्य त्याच्यासोबत देऊन त्याला रिक्षा किंवा स्कूल बसमध्ये बसवण्यासाठी तयार केलं जातं. हे चिमुकलं बाळ,कधी कधी रडत,डोळे पुसत, स्कूल बसमध्ये बसतं आणि पुन्हा पुन्हा खिडकी मधून टाटा, बाय-बाय करत, हुंदके देत शाळेसाठी रवाना होतं.
वरील प्रसंग सर्वच घरात जरी नसला तरी बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. त्याचं एकमेव कारण म्हणजे लेकराचे बालपण. ज्या वयामध्ये घरात मनसोक्त वावरणं, घरच्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, भरपूर खळखळून हसणं, तितकंच राग आला की,व्यक्त होणं,हवं नको ते मोकळेपणानं घरच्यांना सांगणं,वाटेल तेव्हा जेवणं,वाटेल तेव्हा उड्या मारणं, वाटेल तेव्हा झोपणं,वाटेल तेव्हा खेळणं या त्याच्या नैसर्गिक वृत्तीला बंधन येतात. मग या वयातील या मानसिकतेमधील ही लेकरं खरंच आनंदी वृत्तीने राहत असतील का हो? असतील तर छानच, पण सगळीच दोन ते पाच वयोगटातील ही लेकरं इतक्या आनंदाने घरच्यांनी पाठवलेल्या शाळेत आनंदाने रमत असतील का हो? आणि जर आनंदी नसतील तर ते खरंच आपल्याला हवं असलेलं शिक्षण ते घेत असतील?
शाळेमध्ये सुद्धा आता त्यातली त्यात इंग्रजी शाळा असेल तर खूप सारा अभ्यास क्लासवर्क,होमवर्क,वेगवेगळे नोटबुक,बुक्स पूर्ण करायचे असतात. त्या पूर्ण नाही झाल्या तर पेरेंट्स मिटिंगमध्ये त्याबद्दल पालकांना विचारणा केली जाते. वेळोवेळी अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी सुचवले जाते.याचा फायदा पुढे किती मोठा आहे हे सांगितले जाते. मग पालकांनाही कुठेतरी मनाला वाटू लागतं की,आपल्या बालपणी आपल्याला हे नव्हतं. मग आता आपल्या मुलांना आपण खूप काही देऊन त्यांनी सर्व काही गोष्टी अवगत केल्या पाहिजेत.हे काही चुकीचे नाही पण त्यासाठी लेकरांचं वय, त्यांच्या मनाची अभ्यास करण्याची तयारी, त्याची शारीरिक कुवत या सर्व गोष्टींचा सारासार विचार व्हायला नको का?मुलांनी न केलेल्या होमवर्कबद्दल पालकांना ऐकावं लागतं आणि मग इथे पालकांना आपली प्रतिष्ठा थोडीशी कमी होते की काय? अशी भीती वाटू लागते. मग या सर्व गोष्टींचा परिणाम असा होतो की, मुल शाळेतून घरी आले की,त्याला शाळेत झालेल्या आणि घरी दिलेल्या अभ्यासाविषयी बोलले जाते. मुलं त्यांच्या कुवतीप्रमाणे छान व्यक्त होतात, बोलतात. त्यांच्या प्रगती विषयी आई-बाबांना जर समाधान नसेल तर त्याला आणखी उरलेल्या वेळेत वेगवेगळ्या ट्युशन्स लावल्या जातात आणि मग लेकरांना सुरू होते ती पुन्हा दुसरी शाळाच. मुलांना शाळेचा,ट्युशनचा आणि घरी आलं की परत घरच्यांचा अभ्यास पूर्ण करायचा असतो आणि मग यातून त्यांच्या मनामध्ये चिडचिडेपणा, अभ्यासविषयी नावड,नकारात्मक भावना तयार होऊ लागतात आणि मग कुठेतरी अभ्यास ही गोष्ट नकोशी वाटू लागते. पर्यायाने नको असलेली गोष्ट जबरदस्तीने करताना तिच्यामध्ये कितपत यश मिळेल हे कोणी सांगू शकत नाही. याचा परिणाम या लेकराच्या मन, बुद्धी आणि शरीरावर होत असतो. हे सर्व टाळण्यासाठी खरंच मुलांना खेळ आवश्यक आहे. मुलं जितकी जास्त खेळतील तितकी ती प्रसन्न,आनंदी आणि निरोगी राहतील.आनंदी आणि निरोगी मनाने केलेलं कोणतेही काम हे यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही,म्हणून पालकांनी अगदी बालवयातच कोणतीही गोष्ट जबरदस्तीने शिकण्याचा हट्ट न करता त्याला नैसर्गिकरित्या उमलु देणं जास्त आवश्यक आहे. बालवयात मुलगा एकदा सशक्त, निरोगी आणि आनंदी वृत्तीचे बनले की,योग्य वेळी आपोआपच त्यामध्ये प्रत्येक गोष्ट घेण्याची वृत्ती तयार होते.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, मूल नैसर्गिकरित्या खूप काही गोष्टी शिकत असते. आजूबाजूच्या परिसरातून पाहिलेल्या,ऐकलेल्या घटनेमधून तर्क-वितर्क या अनुषंगाने त्याचा बौद्धिक,मानसिक, शारीरिक,भावनिक असा सर्वांगीण विकास होत असतो. गरज आहे ती फक्त हे सर्व त्याला अनुभवण्याची.मुलांचा जेव्हा नैसर्गिक रित्या सर्वांग सुंदर असा भावनिक, मानसिक आणि शारीरिक विकास होईल तेंव्हा निश्चितच त्याचा बौद्धिक विकास होण्यास वेळ लागणार नाही. विनादडपणाने केलेल्या प्रत्येक गोष्टी या यशस्वी होतात. तसं मुलांकडून आपल्याला हवं असलेलं काम करून घेण्यासाठी त्याच्या मानसिकतेचा आणि भावनिकतेचा विचार नक्कीच व्हायला हवा. जबरदस्तीने केलेली कोणतीही गोष्ट ही यशस्वी होत नाही किंवा झाली तर ती टिकून राहत नाही. तसंच काहीसं मुलांना योग्य वयामध्ये, योग्य वेळी जर त्यांना शिकण्यासाठी तयार केलं तर निश्चितच मुलं अगदी हसत हसत,आनंदाने, उड्या मारत शाळेत जातील आणि तिथेही स्वतःहून,आनंदाने सर्व गोष्टी मनाने, शरीराने आणि भावनिकतेतून स्वीकारतील आणि मग त्यांच्या बौध्दीक विकासास आपोआपच चालना मिळेल. सर्वांग सुंदर दृष्टीने मुल शिकण्यास तयार होईल. मुलांचे उज्वल भविष्य हे त्यांच्या निरोगी शरीर आणि निरोगी मनावर अवलंबून आहे. यासाठी आज गरज आहे मुलांना समजून घेऊन,त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार करण्याची. आणि मुलाच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी म्हणजे कुटुंब. असं म्हणतात बालवयामध्येच खर तर कुटुंबातच मुलाच्या भविष्याचा पाया मजबूत होतो. कारण कुटुंबच मुलाची पहिली शाळा असते. आई हीच मुलाची पहिली गुरु असते. शाळेत येण्यापूर्वीच त्याची शिक्षणाची सुरुवात झालेली असते. म्हणून याच काळात मुलांना भरपूर, त्यांना हव्या असतील त्या कृती करण्यास वाव द्या, मनसोक्त हुंदडू द्या, त्यांना उमलू द्या.बघा ते कसे उमलतील आणि पुढे शालेय जीवनातही यशस्वी होतील यात शंका नाही.शाळेत इतके रमतील की,शाळेतून घरी आल्यास घरच्यांना सांगतील:-
“ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जसा माऊली बाळा.”