तेजातील तपस्विता…….

              हा माझ्या वर्गातला तेजस महादेव करांडे. आज त्याचा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
              तेजस बद्दल मी दोन शब्द बोलणार आहे गेल्यावर्षीच म्हणजे तो 2024 मध्ये माझ्याकडे इयत्ता तिसरी वर्गात दाखल झाला. वर्गात आला तेव्हाचा हा तेजस म्हणजे खूप अबोल, शांत आणि रडका.हो रडकाच म्हणायचं कारण तो दुसऱ्या गावावरून माझ्याकडे शाळेत आलेला. इथे त्याच्या कोणीही ओळखीचं नव्हतं. ना शाळेचा परिसर, ना गाव, न शाळेतील मित्र. सगळं काही नवीनच होतं त्याच्यासाठी. म्हणून त्याला इथे बसायचं म्हणजे एक शिक्षाच वाटायची कारण तो ज्या शाळेमधून आला होता, ती शाळा म्हणजे अगदी रंगरंगोटी केलेली.तिथे शाळेत येणारी मुलं सुद्धा अगदी स्कूल बसमध्ये बसून येणारी.छान छान एकाच शिक्क्यातील दप्तर असलेली. सगळं कसं डोळ्याला टकाटक टापटीप आणि देखणी असलेली शाळा, अर्थातच इंग्लिश स्कूल मधून आमचा हा तेजस माझ्याकडे दाखल झालेला. त्याच्यासोबतच आणखी चार ते पाच विद्यार्थी आणि हा तेजस मिळून पाच-सहा विद्यार्थी रोज रिक्षाने माझ्या शाळेत येण्यासाठी दाखल झाली होती. 
                  आता मला रोज माझं गाव सोडून माझी पहिली शाळा सोडून मला आता या शाळेत यावं लागणार कारण आई-वडिलांची इच्छा. कदाचित त्याच्या शाळेसारखी रंगरंगोटी केलेली आणि अति कडक शिस्त नसलेली ही शाळा त्याला थोडीशी वेगळी वाटत असावी. म्हणून त्याचे सुरुवातीला काही दिवस मन रमत नसे. रोज सकाळी शाळेत आला की,तो अगदी हिरमुसल्या चेहऱ्याने वर्गात बळच बसवल्यासारखं बसायचा.अगदीच नाराजीने. एकदा वर्गात बसला की ,तो समजून घ्यायचा की आता आपल्याला दिवसभर इथेच बसायच आहे. मग तो हळूहळू शाळेतील सर्व कृती बघायचा. त्याला त्यामध्ये रस मात्र वाटायचा नाही कारण त्याच्या पहिल्या शाळेसारखं इथ काहीच त्याला दिसत नव्हतं. कधीतरी त्याची वडील आई किंवा घरचे कोणीतरी त्याला सोडवण्यासाठी आले की तो हमखास मला शाळेत बसायचं नाही म्हणून रडायचा कशीतरी त्याची समजूत घालू त्याचा दिवस सुरू व्हायचा. सुरुवातीलाच त्याला अगदी जवळ बोलावून त्याचे नाव, शाळेचे नाव, त्याला येत असलेल्या क्रियाकृती, वर्ग तिसरीत असल्याने त्या पद्धतीने त्याच्याकडून वाचन आणि गणितीय क्रिया याची थोडी चाचणी चाचणी केली, तेही त्याला नकळतच. त्याची अध्ययनातील गती माझ्या लक्षात आली. त्याच्या अध्ययनातील गती पेक्षा मला त्याची शाळेत येण्याकडे असलेली गती वाढवावी लागेल हे माझे लक्षात आले आणि मग त्याला छान छान गाणी, छान गप्पा, घरच्या गप्पा, कौटुंबिक गप्पा, त्याचे जुने मित्र, त्याचे घर, त्याची शेती, त्याच्या विश्वात जाऊन थोडंसं त्याच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये माझं स्थान निर्माण होऊ लागलं. तसं तो माझ्याजवळ येऊन माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागला प्रत्येक कृतीमध्ये स्वतःहून सहभाग घेऊ लागला चेहऱ्यावर सुद्धा हळूहळू हसू येऊ लागले सुरुवातीला मी म्हणायची म्हणून तो बळच कसतरी सहभागी व्हायचा कारण मला वर्गातील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक कृतीमध्ये हवा असतो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्याला वेगवेगळ्या कृतींमधून प्रत्येक गोष्टीमध्ये संधी देऊ लागली. तो सुद्धा वाटेल तसं त्या संधीचा आनंद घेऊ लागला. तरीही माझ्या मनाला वाटेल तितका समाधान अजूनही वाटत नव्हतं. माझ्यासाठी त्यानं आणखी खूप काही करायला हवं होतं कारण तो माझ्याकडे शिकण्यासाठी दुसऱ्या गावावरून येत होता.
                 पुढे अचानक त्याचे वडील आजारी पडले. त्यामध्ये तो आणखी शांत झाला. कदाचित वडिलांचा विचार त्याच्या मनामध्ये सतत येत असावा. त्याबद्दल मी सारखे त्याला चौकशी करत असे. तोही अगदी मनमोकळेपणाने मला सांगत असे.अधून मधून त्याच्या आईशी सुद्धा बोलणे होऊन मी त्याच्या वडिलांची चौकशी करत असे. तेजसला आता वातावरणाशी आपुलकी वाटू लागली होती. शाळेमध्ये होत असलेली प्रत्येक कृती तो आता मनापासून करू लागला होता. न येणाऱ्या गोष्टीही विचारू लागला होता. मग ती भाषा असो, वाचन असो, लेखन असो, गोष्ट सांगणे असो, परिपाठाचे सूत्रसंचालन करणं असो, सहशालेय उपक्रम असो, की गणिती क्रिया असो.सगळ्या शालेय गोष्टींमध्ये तो आता चांगलाच रस घेत असलेला दिसून येऊ लागला. अगदी हसतच शाळेत येण्यापासून ते शाळा सुटेपर्यंत. तो अगदी प्रसन्न चेहऱ्याने सगळं काही वेचत असे, मनापासून टिपत असे. ते अगदी घरी दिलेल्या अभ्यास पूर्ण करण्यापर्यंत तो अगदी मनापासून सर्व करत होता.आनंदी वृत्तीने दररोज तो अगदी सातत्याने न चुकता शाळेत येऊन सर्व गोष्टी मनापासून करू लागला. तेजसमध्ये झालेला हा बदल खरोखर मनाला आनंद देत होता. आता तर तो अगदी जसं अब्जपर्यंत संख्या वाचन सुद्धा इतर मुलांबरोबर करू लागला होता इतर मुलांसारखंच मला सुद्धा यावं ही धडपड त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होती आणि त्या पद्धतीने त्याचं शिकणं आनंदाने सुरू होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये, मी हे करू का ? असं आता तो विचारू सुद्धा लागला होता. त्याचं नाव घेतल्याबरोबर तो वर्गात पुढे येऊ लागला.छान सादरीकरण करू लागला आणि शिकण्यातील आनंद घेऊ लागला त्याच्या आनंदाने माझा आनंद मात्र द्विगुणीत होत होता.
                इंग्रजी शाळेमधून आलेल्या तेजसचा चेहरा आता आत्मविश्वासाने चमकू लागला होता. सुरुवातीला मला हे येत नाही म्हणून रडत नको म्हणणारा तेजस आता मी हे करू का ?असं बोलत होता. एबीसीडी चाही पुढे जाऊन इंग्रजीत काय पण अगदी मराठी, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांमध्ये सुद्धा त्याचं तेज आता दिसू लागलं होतं. तेजाची तपस्विता दिसू लागली होती.इथे येण्यातील त्याचा आनंद आता कैक पटीने दिसू लागला होता.खऱ्या अर्थाने माझ्यासाठी एका वर्षामध्ये तेजस मध्ये अपेक्षा पलीकडे बदल दिसत होता. त्याची वाटचाल आता खऱ्या अर्थाने शिक्षणाकडे होत आहे.अबोल असणारी ही कळी आता चांगलीच फुलत चालली होती.त्याचे स्मित हास्य मला बरच काही सांगून जाते.अबोल कळीच्या फुलत चाललेल्या फुलांमधील सुगंध हळूहळू मनाला गंधित करत होता. आज माझ्या या तेजसचा वाढदिवस. या गुणी बाळाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. खूप मोठा हो बाळ. यशवंत,कीर्तीवंत गुणवंत हो!!! तुझ्या यशाचा दरवळ सातासमुद्रापार जावो.हीच आज तुझ्यासाठी मनोकामना.

स्वानुभव
श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे
शिक्षिका बीड

2 thoughts on “तेजातील तपस्विता…….”

  1. खूप छान..
    आपण एक आदर्श शिक्षिका आहात. मॅडम.

    Reply

Leave a Comment