बऱ्याचदा आपण आई विषयी भरभरून ऐकतो आणि भरभरून बोलतो.एवढेच नव्हे तर आई वरती अनेक काव्य गीत रचली जातात आणि तितक्याच संवेदनशील तेने गायली जातात. त्या प्रमाणात वडिलांवर केलेल्या रचना ह्या दुर्मिळच भासतात.
माझी आई तशी जेमतेम थोडसं कसंतरी वाचता येणारी. शिक्षण नाही म्हटलं तरी चालेल. तरीही आमच्या यशामध्ये आईचा 90% वाटा. वडील मात्र शिस्त,कामातील नियमितपणा,समंजस,सहकार्यवृत्ती, टापटीपपणा,खिलाडूवृत्ती, वक्तशीरपणा या आणि अशा गुणांनी ओतप्रोत भरलेलं हे व्यक्तिमत्व. बालवयापासूनच आमचं एकत्र कुटुंब. आजोबा, तीन काका आणि वडील आणि पुढे आम्ही सर्व मिळून 11 बहीण भावंडे.छान अगदी सगळ्यांच्या लाडाकोडात वाढलेलो. वडील दोन नंबरचे असले तरीही कुटुंबामध्ये सगळ्यांना हवं नको असं पाहणारे अगदी प्रमुखाची भूमिका तितकीच कसोशीने बजावणारे. कुटुंबासाठी हवा नको बघणं म्हणजे हे त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी जणू.
चारही भावंडांमध्ये मोठे काका जय भवानी साखर कारखान्यावरती नोकरीला होते. दोन नंबरचे वडील.आष्टीला सुरुवातीला नोकरी करून त्यानंतर जय भवानी माध्यमिक विद्यालय येथे माध्यमिक शिक्षक. हिंदी विषयाबरोबरच खेळाचे शिक्षक सुद्धा. त्यामुळे अभ्यास,खेळ,शिस्त, वागण्या बोलण्यातील खरेपणा अर्थातच खोटेपणाची मुळातच चिरड आणि खिलाडू वृत्ती हे जणू काही त्यांच्या नसानसात भिनलेले. या गुणामुळेच शाळेतील सर्व सहकारी, शिक्षक मित्र आणि विद्यार्थ्यांमध्ये ढेरे सर म्हणजे आवडते व्यक्तिमत्व आवडते शिक्षक. वेळप्रसंगी रागावणारे, रागवल्यानंतरही थोड्याच वेळात मुलांना त्यांच्या विश्वात लगेच सामावून घेणारे असे माझे वडील सर्वांचे लाडके आप्पा.
आम्हाला घडवताना देखील त्यांची तीच शिस्त अगदी बालवयापासूनच आमच्या अंगी असावी, अभ्यासवृत्ती वाढावी, वागण्या बोलण्यामध्ये नम्रता असावी आणि विशेष म्हणजे समाजात वावरताना संयम कसा असावा? एखाद्या कडून काही चूक झाली तर त्यांना समजावून कसं सांगावं हे शिकावं आमच्या अप्पांकडूनच आपण कडूनच. मग ती शाळा असो, विद्यार्थी असो, कुटुंबातील व्यक्ती असो,ती लहान असो किंवा मोठी असो किंवा शेजारीपाजारी, मग तो कोणीही असो अगदी लिलया पद्धतीने त्यांची समजावण्याची हातोटी.
पुढे मी पहिलीत वर्गात जाणार म्हणून आजोबांनी वडिलांना तू आता गढीलाच राहायला जा असं सांगितलं आणि नोकरी निमित्ताने आम्ही गढी या ठिकाणी राहायला गेलो. पहिली ते चौथी वर्गाचे शिक्षण गढीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. बालवयापासूनच कोणतीही गोष्ट मनापासून कशी करावी याची आवड निर्माण करणारे माझे वडीलच.कोणतीही गोष्ट करायची ती मनापासूनच. हा गुण त्यांनी अगदी बालवयातच आमच्यामध्ये रुजवून टाकला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आवड आणि प्रत्येक गोष्ट तितक्याच आवडीने कशी करावी याची पक्की हातोटी आपण कडूनच आलेली. त्यामुळे शाळेतील अभ्यास असो,गीत गायन असो, शाळेतील परिपाठ असो,भाषण असो किंवा शाळेत वर्गात सांगितलेली कोणतीही गोष्ट असो यामध्ये कायमच पुढे राहिले.
सकाळची सुरुवात आमची अगदी भल्या पहाटे म्हणजे चार वाजताच व्हायची.एक आवाज देऊन आप्पा आम्हाला उठवायचे.बरोबर आईही उठायची.शिक्षण नसले तरीही आमच्याबरोबर जागायची.आप्पा सुद्धा सकाळी उठून काहीतरी वाचत बसायचे.मग पाच साडेपाच वाजले की त्यांचा व्यायाम सुरू व्हायचा.कारण या व्यायामानेच त्यांच्या तब्येतीत फरक पडला होता.पुढे उजाडले की आई ती तिच्या कामाला लागायची.घरी शिक्षणासाठी चुलत भावंड,आजी आजोबांचे आजारपण,घरी दोन ट्रॅक्टर असल्याने त्यावरील कामगार आणि येणारी जाणारी सारखा असा घरी राबता असायचा.आईला सारखं काम असायचं.एवढं सगळं करताना ती कधीच थकलेली किंवा कोणाला काही चिडचिड, रागराग केलेली पाहिल नाही. घरी कायम राबता असायचा.एवढं सगळं असून सुद्धा आमच्या शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष होऊ द्यायचे नाही. आमच्या आप्पांनी कधीच कोणती वस्तू अगदी सहजपणे घेतली नाहीतू स्कॉलरशिप मध्ये पास झाली की मग तुला घड्याळ घेणार(तेव्हा स्कॉलरशिप परीक्षा चौथी ला असायची)तू वर्गात पहिली आलीस तर तुला ही वस्तू मिळणार.तुला परिपाठ घ्यायचा तर प्रतिज्ञा इंग्रजीतच म्हणायची.असं मोटिवेशन कायम असायचं.मलाच नाही तर शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक जण त्यांचाच मुलगा आहे अशी भावना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असायची.त्यांच्या या मोटिवेशन मुळेच त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.त्यामुळे अगदी कायम प्रथम असण्याचा स्वभावच जणू माझा बनला होता.एकही मार्क कमी पडला (पडत तर नव्हताच पण पडलाच तर) झोपच यायची नाही.कधी पुन्हा परीक्षा होते आणि मी पुन्हा कधी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवते असं होऊन जायचं आणि हा माझ्यातील गुण माझ्या सर्व गुरुजनांना, शिक्षकांना,वर्गातील सर्वांनाच माहीत होता.जयभवानीला त्यावेळेस एका एका वर्गाच्या चार ते पाच तुकड्या असायच्या.प्रथम येण्याचा मान मिळायचा तो फक्त आप्पांनी लावलेल्या या सवयींमुळेच.
कायम अभ्यासात पुढे असणारी मी मनामध्ये पुढे डॉक्टर होण्याची उमेद जागी झाली.वडीलही ते जाणून होते. पण का कोण जाणे मला आत्या नसल्यामुळे आजोबांची लाडकी मी.आजोबाना दमा असल्याने सतत आजारी असायचे.कायम आजारपण मागे असायचं.सतत दवाखाना मागे असायचा, तरीही खूप संयमी समंजस प्रत्येकाला समजून घेणारे माझे आजोबा.आमचे आण्णा. घरात अकरा भावंडांपैकी मीच सर्वात मोठी होते आणि आजोबांची लाडकी. मला डॉक्टर व्हायचे होते. अभ्यासात कुठेच मागे नसणारी मी आऊट ऑफ मार्क मिळवणारी,वडिलांनाही दिसत होते. त्या दिशेने वाटचाल सुरू होती. पण पुढे आजोबांनी हट्ट केला की माझ्या डोळ्यासमोर पिंटिचे लग्न कर.(माझी बालपणीचे टोपण नाव)हे ऐकल्यानंतर वडिलांनीही त्यांच्या वडिलाखातर मला अकरावीला आर्ट्स घेण्याचा निर्णय केला. दहावी वर्गात तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवणारी मी आर्ट्स घेण्यासाठी तिथेच गेले. पण पवळ सर (गेल्या वर्षीच आजारपणाने सरांचे निधन झाले) यांनी माझी समजूत घातली आणि वर म्हणाले,"" तूच जर आर्ट्स घेतले तर सायन्सला कोण येणार? कारण सायन्सची पहिलीच बॅच त्यावर्षी होणार होती.सगळ्या शिक्षकांनी अगदी समजावून सांगितले.आप्पांना सुद्धा. एवढेच काय पण आमच्या प्राचार्य श्रीमती नागणे मॅडम या त्यावेळेस त्यांच्या मुलीच्या आजारपणामध्ये हॉस्पिटलला मुलीला घेऊन ऑपरेशनसाठी पुणे या ठिकाणी होत्या. त्यांनीही तिथून पत्र पाठवलं की, ढेरे सर, तुम्ही उषाला सायन्स घेऊ द्या,ती खूप हुशार आहे. तिचंच नाही तर आपल्या कॉलेजचं, शाळेचं नाव सुद्धा ती मोठं करणार आहे. वडिलांनी सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. प्रत्येक चाचणीमध्ये परीक्षेमध्ये अगदी मनासारखे गुण येत होते.अर्धा मार्क सुद्धा मुश्किलीने कटायचा.परंतु वडिलांच्या मनामध्ये त्यांच्या वडिलांचा विचार कायम होता. आजारपणामुळे जर वडिलांना काही झाले तर मनात कायमसल राहील असं त्यांना सतत पोहोचत राहायचं आणि मग मला पुन्हा नाईलाजाने बारावी आर्ट्सला प्रवेश दिला.मनामध्ये डॉक्टर व्हायचे स्वप्न हे स्वप्नच राहणार होते.आर्ट्स घेतले म्हणजे पटकन दोन वर्षांमध्ये डीएड करता येईल,हुशार आहे म्हणून नुकसानही होणार नाही आणि मग आजोबांच्या डोळ्यासमोर लग्नही करता येईल. म्हणजे एकूणच वडिलांची इच्छा की माझ्या हुशारीचे नुकसान होऊ नये आणि आजोबांचेही मन मोडू नये हा प्रांजळ हेतू.
बारावी आर्ट्स घेऊन अभ्यास सुरू झाला. पुन्हा पुन्हा वडील आठवण करून द्यायचे की, डीएडला नंबर लागलाच पाहिजे. नाहीतर मग बाजाच. मनात खूप वाईट वाटायचे,खूपदा रडायचे सुद्धा.परंतु म्हणायची हिंमत नव्हती.रडत कुढत,मनात नसतानाही अभ्यास करून तेव्हाही प्रथम क्रमांकाने बारावी उत्तीर्ण होऊन पहिल्याच यादीमध्ये डीएडला नंबर लागला.ऍडमिशन झालं,फर्स्ट इयर सुद्धा छान गुणांनी उत्तीर्ण झाले. आमच्या अण्णा आजोबांना लग्नाचे वेध होतेच.कारण त्यांना स्वतःचा आणि आजाराचा भरवसा नव्हता. आजार कधी दगा देईल आणि माझ्या नातीला नवरी झालेलं बघायचं राहून जाईल याची सारखी भीती होती.म्हणून डीएडच्या दुसऱ्या वर्षाची फक्त परीक्षा बाकी होती आणि तेव्हाच आजोबांच्या डोळ्यासमोर विवाह पार पडला.
एकूणच काय तर माझ्या अप्पांनी गुणांचे चीजही केले, त्यांच्या वडिलांचे स्वप्नही पूर्ण केले, माझं स्वप्न जरी पूर्ण केले नसेल तरीही माझ्या हातून मागील 23 वर्षात जे विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच कदाचित मला शिक्षक पेशात आणल असावं. मी डॉक्टर झाले असते तर कदाचित एकटीच डॉक्टर राहिले असते. हे कदाचित जणू माझ्या आप्पांना त्याच वेळी कळालं होतं.
आज माझे विद्यार्थी यशस्वी होताना पाहून मनस्वी आनंद होतो. विशेष म्हणजे मला डॉक्टर व्हायचे होते असं रडत न बसता जे आहे त्यामध्ये उत्तम उत्तम करण्याचा कायम प्रयत्न असतो.आज पितृ दिनाच्या निमित्ताने मला आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा दाखवून पितृत्वाच्या हक्काने घडवणाऱ्या माझ्या आप्पांना पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.आपणास कायम निरोगी आयुष्य,आयुरारोग्य मिळो. कायम सदिच्छा आणि आशीर्वादाचा हात पाठीशी राहो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.... पितृ दिनानिमित्त मागील 45 वर्षाच्या आठवणी.....

Happy father’s day Appa
व्हेरी nice 👏👏👏👏
Thanku for your comments
Very Nice 👌