हा माझा वर्गातील स्वप्निल…
इयत्ता तिसरी वर्गात शिकणारा.तसं पाहिलं तर घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील कामानिमित्त काही दिवस बाहेरगावी स्थलांतरित होतात. ठराविक दिवस कामानंतर ते परत गावी येतात. हा त्यात एकुलता एक म्हणजे पर्यायाने लाडका. लाडका नव्हे तर अति लाडकाच. तो म्हणेल तेच आई-वडिलांनी करायचं. आई वडील म्हणतील ते त्यानं करायचं हे कधी घडतच नाही. पहिली,दुसरीत शाळेत यायचा तो डोळ्यांतील गंगा,यमुना घेऊनच…..शाळेत न येण्यासाठी रोज नवी कारणं ही ठरलेलीच… कधी शाळेत येऊ वाटायचं नाही कधी आईला सोडून वर्गात बसायचं नाही. कधी आई तूच माझ्यासोबत वर्गात बस, आज माझा पेन संपला, आज मला ताप आली, अशी वेगवेगळी कारण त्याच्याकडे रोजच ठरलेली असायची. मग सुरु व्हायची माझी कसरत. त्याला काहीतरी वेगवेगळे सांगून तो खुश होईल असं तरी काहीतरी करून त्याला चॉकलेट देऊन, तू खूप हुशार आहेस असं बोलून,त्याच्या मनासारखं काहीतरी त्याला छान सांगून चेहऱ्यावरती हसू आणायचं हे ठरलेलं. माझ्यासाठी स्वप्निल म्हणजे रोज एक आव्हान असायचं कारण त्याला मला वर्गात बसवायचं होतं. एकुलता एक स्वप्निलला घडवायचं होतं. तब्बल पहिली, दुसरी दोन्ही वर्ग हे त्याचे रडण्यातच संपले.
शाळेत येतानाच कसतरी चेहरा घेऊन,अगदी रडकुंडीला येऊन नव्हे तर रडतच शाळेत येणे हा त्याचा जणू दिनक्रमच होता. तो क्वचितच शाळेमध्ये हसत आला असावा. आई-वडील सुद्धा अगदी थकून जायची त्याला शाळेत बसवता बसवता, पण स्वप्निल काही खुशीने किंवा हसत शाळेमध्ये बसायचा नाही. मग त्याला रोज रोज असं बघून, याला नेमकं काय केलं म्हणजे तो रोज शाळेतील आणि तेही अगदी हसतच,याचा विचार सतत मनात यायचा.कारण शाळेची सुरुवात याच्या रडवेल्या चेहऱ्याने व्हायची आणि मग सगळा वर्ग त्याच्याकडेच बघत राहायचा आणि पर्यायाने आपल्याला जे करायचं ते मनासारखं व्हायला वेळ लागायचा. आई-वडिलांची खूप तळमळ दिसायची. स्वप्निलने वर्गात बसावं, इतर मुलांसारखं गाणी, गोष्टींमध्ये रमावं,चार अक्षर शिकावीत, खडखड पुस्तक वाचावं आणि इतर मुलांसारखं सगळ्या कृती – उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यानं हसतच शाळेत यावं आणि ते काही चुकीचं नव्हतं. स्वप्निल ला शाळेत आणायचं म्हणजे आई-वडिलांची कसरतच होती असं करत करत पहिली दुसरीचे वर्ग आता संपले होते माझ्या डोक्यातून मात्र त्याच्याविषयीचा विचार संपत नव्हता स्वप्निल तसा गुणी मुलगा. शांत, कधी कोणाला खोड्या न करणारा, मनात येईल तेव्हा सांगितलेलं शांत बसून ऐकणारा, दिलेलं काम कधीतरी मनात येईल तेव्हा वहीवर टिपणारा, जास्त काही कोणामध्ये न मिसळणारा असा हा अबोल आणि गुणी बाळ.
आता त्याचे पहिली दुसरीचे वर्ग संपले होते पण मला त्याच्यामध्ये हवा तसा बदल जाणवत नव्हता,दिसत नव्हता आणि स्वप्निलमध्ये बदल घडवण हे माझ्यासाठी आव्हान होतं आणि ते मी घेतलं होतं.
इयत्ता तिसरीमध्ये आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारे रिझवून,त्याच्या मनातील, त्याला आवडेल त्या कृती, त्याच्या वेळेप्रमाणे देण्यास सुरुवात केली. त्याला वाटेल तेव्हा तो त्याच्या मनाप्रमाणे, त्या कृती पूर्ण करायचा. मग त्या त्याच वेळेत करी,दुसऱ्या दिवशी किंवा करतही नसे. पण चुकून सुद्धा त्याला न रागवता जे काही त्याने केलं ते खूप सुंदर आहे, तू खूप हुशार आहेस, तू खूप मोठा होणार आहेस, असं त्याच्या आवडीचे वाक्य त्याला बोलून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले की,आता तो निश्चित काहीतरी करणार हे मला कळायचे. त्याच्या आवडीचं बोललं की स्वप्निल खुश आणि मी दिलेलं काम त्याने केलं की मीही खुश अगदी कृतार्थ झाल्यासारखं. मग हळूहळू त्याच्या मूडप्रमाणे कधी फक्त मुळाक्षरे, कधी फक्त साधे शब्द,कधी वेलांटीचे शब्द,असं सुरू करून शब्द, वाक्य, उतारा, असं करत करत हळूहळू आम्ही आता पाठाकडे वळलो होतो. साहित्याच्या माध्यमातून त्याला अगोदर मला बोलत करायचं होतं. कारण तो बोलला तरच त्याच्या मनातील गोष्ट मला कळणार होती आणि त्यातून तो उमगणार होता. वेगवेगळ्या खेळांमध्ये तो आता हळूहळू खेळू लागला होता. वेगवेगळ्या कृतीमध्ये तो सहभाग घेऊ लागला होता.इतरांमध्ये मिसळू लागला होता,जमेल तसं तो सांगत होता, बोलत होता, जवळ येऊन हळूच काहीतरी केल्याचं हसून सांगत होता. त्याचं हे हसू माझ्या मनाला धुमारे फुटल्यासारखं वाटायचं. मी काहीतरी मिळवल्याचं वेगळं समाधान मला वाटत होतं. सगळी मुलं अगदी छान मनासारखं करत होती परंतु स्वप्निल हा लाजराबुजरा, कधीही न उमगणारा परंतु आता माझ्या खूप जवळ येऊ लागला होता.घरचा दिलेला अभ्यास त्याने कसा पूर्ण केला हेही हळूच येऊन कानात सांगू लागला. त्यातही अगदी मनमोकळे. शाळेत येतानाच अगदी त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललेले दिसायचं आणि मला लगेच समजायचं की आता नक्कीच माझ्या जवळ येऊन स्वप्निल काहीतरी नवीन सांगणार आहे आणि अगदी मला वाटायचं तसंच तो माझ्याजवळ यायचा आणि त्यानं आज नवीन काय केलं आहे हे मला खूप छान पद्धतीने हळू आवाजात कानात सांगायचा. मलाही त्याच्यासारखंच मनातून हसू यायचं, आनंद वाटायचा आणि आता स्वप्निल शाळेमध्ये खूप छान रमायला लागला याचा जणू परमानंद वाटायचा. माझ्यासाठी स्वप्निल शाळेत खुशीनं आला की, सार्थक झाल्यासारखं वाटायचं कारण मला या आई बाबांच्या एकुलत्या एक स्वप्निलला शाळेत सुद्धा एकुलता एकच आहे असं वाटायचं,तितकंच छान ट्रिट करायला मला आवडायचं. सर्व वर्गाच्या पुढे त्याचं मी खूप कौतुक करायची. त्यामुळे तो आता छान पैकी फुलत चालला होता अगदी जोडाक्षरयुक्त शब्द सुद्धा तो छान वाचू लागला होता आणि उजळणी बरोबरच पाढे सुद्धा तो मनापासून पाठांतर करू लागला होता. पहिली, दुसरी वर्गामध्ये सतत गैरहजर राहणारा हा माझा स्वप्निल आता तिसरीमध्ये शाळेमधील सर्व उपक्रमांमध्ये आनंदाने सहभाग घेऊ लागला. खेळ, गाणी, गोष्टी, विविध विषयातील विविध उपक्रम,त्यामध्ये आनंद घेऊ लागला या आनंदा बरोबरच तो वाचन, लेखन आणि सर्व गणिती क्रियांमध्ये सुद्धा रस घेऊ लागला. घरचा अभ्यास सुद्धा तो आता छान पूर्ण करत होता तोही अगदी हसत खेळत. आनंदाने एकही दिवस आता माझा स्वप्निल घरी राहत नाही किंवा रडत शाळेत येत नाही. आज तिसरी वर्गाच्या शेवट आला आहे. त्याच्यामध्ये मला आता छान बदल दिसत आहे. आज तर तो जवळ येऊन मला सांगत होता.मॅडम, माझा 28 चा पाढा चालू आहे. त्याच्या बोलण्यामध्ये एक आत्मविश्वास होता, चेहऱ्यावर आनंद होता, मी काहीतरी केले याचा समाधान होतं आणि आता मला खूप काही येते हा अविर्भावही होता आणि हे सगळं पाहून माझ्यातील मी सुद्धा कृतार्थ झाले होते कारण मी सुद्धा घेतलेलं आव्हान लीलया पेलले होते.

Very nice article