सण नागपंचमीचा
आज 9 ऑगस्ट 2024 श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला एक सांस्कृतिक परंपरा आहे. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे अगदी छान श्रावण सरी बरसलेल्या असतात. सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू नेसलेला असतो. अगदी निसर्ग भरभरून बहरलेला असतो. अशा या हिरव्यागार शालूने नटलेल्या या धरणी मातेला जणूकाही श्रावण महिन्यातील सणांची एक अनामिक ओढ लागलेली असते असेच वाटते. अगदी बालपणापासून घरामध्ये श्रावण महिना आला की, सणावारांची लगबग सुरू असलेली दिसते.
प्रत्येक जण अगदी या रूढी परंपरेतून आपल्या भारतीय परंपरेनुसार संस्कृती जपतात आणि या रुढीपरंपरेतून पुढच्या पिढीला नकळतपणे आपल्या या संस्कृतीचा सांस्कृतिक वारसा देण्याचा निश्चित छान प्रयत्न करतात. सौर वर्षातील हा श्रावण महिना म्हणजे जणूकाही या सर्व महिन्यांचा राजाच श्रावण सरी बरोबरच सणांच्या सुद्धा आनंदाच्या सरी प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा बरसत असतात. अगदी मनातून या सणांची तयारी घराघरात चाललेली असते. प्रत्येक कुटुंबामधील महिलावर्ग, मुली या वेगवेगळ्या सणांमध्ये गुंतून गेलेल्या दिसतात. कोणी कोणी तर श्रावणमास सुरू झाला की,पूर्ण महिनाभर उपवास धरतात. त्याही पुढे जाऊन श्रावण मासापासून उपवास सुरू करून पुढे सलग चार महिने चातुर्मासही धरला जातो. उपवास म्हणजे एक शरीरशुद्धीचा मार्ग.खरे शास्त्रीय कारण पाहिले तर,आपण सतत वेगवेगळा आहार घेत असतो. नकळतपणे कधी जास्तीचा आहार घेतल्याने ते अपचन झाल्याने आपण आषाढ श्रावणामध्ये आजारी पडतो. त्यामुळे थकवा जाणवतो. आषाढ, श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणही थोडे दूषित झालेले असते. त्यामुळे पचनक्रिया मंदावली जाते आणि म्हणूनच या दिवसांमध्ये अधून मधून उपवास धरले की, शरीरशुद्धी होण्यास मदत होते.घरातील ज्येष्ठ मंडळींना हे जरी माहीत नसले तरी परिणाम मात्र त्यांना माहीत असतात.भावनेला विज्ञानाची जोड दिली की,प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव लगेच समजून येतो.
कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी तर कोणताही उपवास धरण्यात अगदी माहीर असतात आणि खरंच सांगायचं झालं तर या व्रतवैकल्यामुळे घरामध्ये सुद्धा एक पावित्र्याचे मांगल्याचे वातावरण तयार होते.घर अगदी सकारात्मक ऊर्जेने भरून जाते.
श्रावण महिन्यामध्ये घराघरात सणावारांची रेलचेल असते. सुरुवात होते ती नागपंचमीच्या सणाने. पुढे रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव असे सण म्हणजे महिला वर्गांसाठी तर एक पर्वणीच असते. त्यातही श्रावणी सोमवार, या सोमवारी प्रत्येक जण शिव शंकराची उपासना करून शंकराच्या चरणी लीन होतात. या श्रावण महिन्यातील वातावरण म्हणजे या सणावारांनी मनाला दिलेली एक नव उभारीच असते.
आज श्रावण महिन्याबद्दल सांगायचं म्हणजे नागपंचमी यानिमित्ताने पूर्वीपासूनच या महिन्यामध्ये या सणाचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सर्व महिला भावासाठी उपवास धरून त्याच्या दीर्घायुष्यासाठी मनोमन प्रार्थना करतात. या दिवशी वारुळाला सुद्धा जातात. वारुळाला जाऊन नागोबाची पूजा केली जाते. खरंतर आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो वारुळाला जाऊन वारुळाची पूजा अर्थातच नागाची पूजा केली जाते, परंतु आज आपण आजूबाजूला पाहतो की,आपण साप पाहिला की, भीतीपोटी सापाला मारले जाते. नकळतच त्यामुळे आपण निसर्गाची हानीच करत असतो. निसर्गामध्ये एक जीव चक्र असते. प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. निसर्गाने प्रत्येक सजीव निर्माण केला आहे तो काहीतरी उद्देशा पोटीच प्रत्येक जीव हा निसर्गासाठी उपयोगाचाच आहे त्यामुळे निसर्गाची शान तर वाढतेच पण प्रत्येक सजीव हा निसर्गामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे निसर्गाने निर्मिलेल्या प्रत्येक सजीवाचे रक्षण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्यच आहे. साप हा असा एक प्राणी आहे की,तो शेतामधील पिकाची किंवा धान्याची नासाडी करणाऱ्या उंदराला खाऊन त्याची उपजीविका तर करतोच परंतु शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळतो असे म्हणतात. दर तीन पोत्यापैकी एक पोते धान्य उंदीर खातो आणि शेतकऱ्याची पिकाची नासाडी करतो. मग याला खाणारा साप जर आपण मारला तर परिणामी मानवाचेच नुकसान होते. असं म्हणतात “धामीन पाळा धान्य उत्पादन वाढवा”. यावरून आपल्याला या प्रजातीचे महत्त्व लक्षात येते म्हणून आपण वारुळाला किंवा नागाला पुजण्यापेक्षा त्याचे जतन करण्यासाठी संवर्धन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले तर याचे पुण्यच आपल्याला लाभणार आहे म्हणून की काय भावाच्या उपवासाबरोबरच नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागोबाची पूजा केली जाते अगदी महिलावर्ग मेहंदिने रंगलेल्या हाताने, प्रसन्न मनाने दूध लाह्याचा नैवेद्य घेऊन मनामध्ये नव उत्साहाने नागोबाला वारुळाला पुजण्यासाठी जातात आज आपण पाहतो शहरी भागामध्ये या शहरीकरणाच्या रगडामध्ये बऱ्याच महिलावर्गांना प्रत्यक्ष वारुळाला जाणं होत नसल्याने घरामध्येच नागोबाच्या फोटोला पुजले जाते. माध्यम कोणतेही असो परंतु मनातील भावना मात्र एकच आहे प्रत्यक्ष नागपंचमीच्या दिवशी सगळ्या महिला अगदी पहाट पासूनच उठून घर अंगण स्वच्छ करून पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी तयार होतात याही दिवशी वारुळाला जाऊन सणाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो दुपारी सगळा स्वयंपाक आवरून सर्व महिलावर्ग मुली अगदी नटून थटून घराच्या बाहेर पडतात ते झोका खेळण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या मैत्रिणीला सोबत घेऊन एकमेकींच्या झोक्यावरती सोबतीने झोके घेण्यासाठी प्रत्येकीच्या घरी जातात आणि झोक्याचा आनंद घेतात या धकाधकीच्या जीवनामधून खरोखर मनाला विरंगुळा आणि एक नवीन उभारी देण्याचं काम हे वेगवेगळे सणवार देत असतात आणि या सणावाराचा आनंद प्रत्येक महिला भगिनी मुली आणि या चराचरातील जीवसृष्टी घेत असते आपल्या भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याचे महत्त्व आपल्या कृती मधून आपण आपल्या पुढच्या पिढीला देत असतो आणि पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे चालू राहतो.
नागपंचमीच्या या सणाच्या निमित्ताने मी सुद्धा आज माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मुलांना, या सणाचे महत्त्व सांगून त्याविषयी बोलते करून त्यांचे अनुभव ऐकून त्यामध्ये आपल्या अनुभवाची भर घालून त्यांना बोलण्यास लिहिण्यास प्रेरित केले. या सणाचे नेमके महत्त्व काय? तो कशामुळे साजरा केला जातो? सण का साजरे केले जावेत किंवा का करतो? या संदर्भात चर्चा करून मुलं मनसोक्त बोलती केली. मग आपसूकच नागपंचमी या सणाचा आत्मा म्हणजे ‘झोका’ तो घेण्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या शाळेच्या बाजूला असलेल्या झोक्यावरती गेलो. आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी अरविंद देवकते, आवर्जून प्रत्येक नागपंचमीला झोका बांधल्यानंतर शाळेत सांगायला येतो आणि मग न राहून आम्ही सर्व, मुले या झोक्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी झोका खेळण्यासाठी जातो. खरंच प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाला आनंद जर मानवाला घेता आला तरच या जीवनाचा खरा आनंद नेमका कशात आहे हे आपल्याला समजून आपण त्याचा परमोच्च आनंदाचे धनी होतो.
म्हणून म्हणावेसे वाटते:-
“हे जीवन सुंदर आहे, ते भरभरून जगू या, आणि आणखीन सुंदर बनवूया”
शब्दांकन
श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे
मुख्याध्यापिका,
प्रा. शा.ढेकणमोहा..बीड
मो. न.9420025078
खूपच छान लेखन