उपस्थिती ध्वज.. एक नवचैतन्य..
आज ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा. अगदीच मराठी महिन्याचा श्रावण महिन्यातील पहिलाच दिवस.नवीन उत्साह, आणि नवचैतन्य जणू काही सृष्टीने आपल्यात निर्माण केले आहे, असे भासत होते. माझी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा ही आज बीड जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास येत आहे. शाळेमध्ये प्रवेश केल्यापासून अगदी शाळा सुटेपर्यंत मुलांना नवनवीन उपक्रमांचा खजिनाच जणू ठेवलेला असतो, आणि हा उपक्रमांचा खजिना मुलं मनसोक्त लुटत असतात. अगदी त्यामध्ये स्वतःची सृजनशीलता वापरून, नाविन्यता आणत असतात. मग तो उपक्रम विषयाशी संबंधित असो, की प्रसंगोपात्त उपक्रम असो .मुलांना उपक्रम म्हटलं की आज आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार या आनंदाने त्यांचे चेहरे फुललेले दिसतात आणि या आनंदी मनानेच प्रत्येक काम, प्रत्येक उपक्रम ते आनंदाने स्वीकारतात. त्यामध्ये सहभागी होतात आणि आनंद लुटतात. तसं पाहिलं तर लहान मुलांना शिकणं हे सुलभ होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, कृती, नवनवीन खेळ आवश्यकच असतात. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये उपक्रमांची भूमिका ही अलौकिक,अनोखी अशी असते. जिथे उपक्रम तिथे शिकणे ही प्रक्रिया अगदी सहज सोपी, सुलभ होते आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही एकतर्फी न राहता बालक केंद्रित होते. जेव्हा शिक्षण ही प्रक्रिया बालक केंद्रित होते तेव्हा नक्कीच शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजेच भारताचा सुजाण सुसंस्कृत नागरिक घडवणे ही प्रक्रिया अगदी सुलभ होते. असेच दररोज माझे,माझ्या शाळेमध्ये,वर्गामध्ये नवनवीन उपक्रम सातत्याने सुरू आहेत मग त्यामध्ये मराठी असो, इंग्रजी असो, गणित असो की कार्यानुभव. प्रत्येक उपक्रमामध्ये शंभर टक्के मुलांचा सहभाग हे विशेष. यामुळे प्रत्येक मूल हे अध्ययनरत होऊन स्वयंअध्ययनास प्रेरित होते. आज पर्यंत Dhere Usha या माझ्या शैक्षणिक youtube चॅनेल वरती 3000 च्या पुढे शैक्षणिक उपक्रम अपलोड केलेले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांचा संपूर्ण सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. पाढे शिकणं असो,इंग्रजी मुळाक्षर शिकणं असो, भाषा समृद्धीसाठीचा उपक्रम असो,स्पर्धा परीक्षेसाठीचा अनोखा उपक्रम असो, व्याकरण असो की आणखी एखाद्या विषयातील घटक असो. तो प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून घेणे हा माझा देण्याचा पिंड. मनोरंजनातून अध्यापन, शिक्षण हा माझ्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा गाभा म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. मुलांना तर हे उपक्रम म्हणजे अगदी परमोच्च आनंदाची पर्वणीच वाटते म्हणून प्रत्येक उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी सक्रिय सहभागी असतोच. त्यामुळे शिकणं हे अगदी सहज होऊन जातं. मुलांमध्ये एक अनोखी उर्जा असते या उर्जेला फक्त दिशा देण्याचं काम शिक्षकाचे असतं आणि तेच मी सातत्याने करते आहे. म्हणून तर माझ्या या ढेकणमोहा प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पट आज सहाव्या वर्षी 5 वरून 83 वर पोहोचला आहे. हे खरं तर या वेगवेगळ्या उपक्रमांचच फलित आहे.
आज खरोखर मनाला सांगताना आनंद वाटत आहे मागील आठ दिवसापासून विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गातील शंभर टक्के उपस्थिती बाबत चर्चा करत होते.तसं माझ्या शाळेची उपस्थिती ही शंभर टक्केच असते. तरीही कधीतरी अधून मधून एखाद्या दुसऱ्या विद्यार्थी घरगुती कारणामुळे घरी राहून वर्गाची उपस्थिती 100% होण्यापासून दुरावते. म्हणून मुलांना परिपाठामध्येच सांगितले जाते की, आपण घरातून निघताना आपल्या आजूबाजूच्या मित्रांना, वर्ग मित्रांना, शाळा मित्रांना, सहयोगी मित्रांना सोबतच घेऊन शाळेत यायचं म्हणजे आपल्या वर्गाची शंभर टक्के उपस्थिती राहण्यास मदत होते आणि खरंच मुलांनाही पटले.मुलं एकमेकांना शाळेत जाताना बोलावू लागली, घंटा वाजताच शाळेकडं पळू लागली पुढे मुलांना असंही सांगितलं की, ज्या वर्गाची उपस्थिती 100% असणार आहे त्या वर्गाला उपस्थिती ध्वज दिला जाणार आहे आणि हा उपस्थिती ध्वज घेऊन आपण मैदानाला एक फेरी पूर्ण मारणार आहात. ही फेरी मारत असताना एक छान नारा देणार आहात जो असा आहे “आम्ही रोज शाळेत येणार 100% उपस्थित राहणार” हा नारा सुद्धा मी थोडा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. वेगळं उपस्थितीबाबत सांगण्याची आता गरज भासणार नव्हती कारण हा नाराच 100% उपस्थितीची शपथ घेतल्यासारखाच होता. प्रत्येक मुलांना तो नारा मागे म्हणावयास सांगितला आणि मुलांनी देखील तो खूप छान आनंदाने म्हटला.आज श्रावण महिन्याच्या श्रावण सरीच्या येण्याने जसे निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते अगदी तसेच शाळेमध्ये सुद्धा या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुलांमध्ये सुद्धा या उपस्थिती ध्वज आता नेमका कोणाला मिळणार पाहून नवचैतन्य निर्माण झाले होते.प्रत्येक जण आपापल्या रांगेमध्ये आपापल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आले आहेत की नाही हे तपासून पाहत होते, मोजत होते आणि आता हा उपस्थिती ध्वज नेमका कोणाला मिळणार ? यावर विचार करत होते परिपाठ संपल्यानंतर शेवटी पाहिलं कोणत्या वर्गामध्ये किती विद्यार्थी उपस्थित आहेत ? तर परिपाठामध्ये आज पहिल्यांदाच उपस्थिती ध्वज मिळवण्याचा मान वर्ग तिसरीने मिळवला होता. या वर्गातील 23 विद्यार्थ्यांपैकी 23 ही विद्यार्थी हजर होते. म्हणून आपसूकच हा उपस्थिती ध्वज वर्ग तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिसणार होता. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि वेगळीच चकाकी दिसून येत होती. विशेष म्हणजे तिसरीच्या वर्गामध्ये इतर वर्गांपेक्षा सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत तरीही त्यांनी आज पहिला मान पटकावण्याचा मान मिळवला होता. हळूहळू बाकीच्याही वर्गातील राहिलेली एक दोन विद्यार्थी येत होते. परंतु अटच अशी होती की, उपस्थिती ध्वज मिळवायचा असेल तर परिपाठामध्येच त्या वर्गाची शंभर टक्के उपस्थिती असायला हवी. म्हणून आज वर्ग तिसरीचे विद्यार्थी हातामध्ये उपस्थिती ध्वज घेऊन “आम्ही रोज शाळेत येणार शंभर टक्के उपस्थित राहणार” असे मोठ्या अभिमानाने म्हणत मैदानावर फेरी मारत होती.जणू काही इतरांनाही असं परिपाठात, शाळेत वेळेत हजर राहिलं की सन्मान होतो हेच जणू इतरांना सांगत होती. मुलं अभिमानाने पुढे पुढे चालत होती, तसंतसा त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद दिसत होता.खरंच यातून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळत होती. प्रत्येक जण थोडं उशीरा येणाऱ्या एखाद्या दुसऱ्याला लवकर यायचं ना, असं म्हणत होती कारण आज त्यांना उपस्थितीत ध्वज त्या एकामुळे मिळालेला नव्हता. खरंच “उपस्थिती ध्वज” ही संकल्पनाच आज विद्यार्थ्यांना आनंद देऊन गेली. निश्चितच या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांना आणि बरोबरच शाळेला सुध्दा फायदाच होणार होता. खरच प्रत्येक उपक्रमाचे विद्यार्थी प्रगतीमध्ये एक वेगळेच स्थान असते.शाळेची, वर्गाची 100/% उपस्थिती आता एकदम सहज सोपी होणार होती. प्रत्येक जण एकमेकांसोबत एकमेकांना घेऊन चालणार होता. एक मैत्रीची भावना यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणार होती आणि एक शाळेला येण्यासाठीची एक वेगळीच अनामिक ओढही चेहऱ्यावर दिसत होती.
आजचा हा “उपस्थिती ध्वज” मुलांमध्ये नवचैतन्याची उर्जाच जणू निर्माण करून गेला.म्हणून म्हणावेसे वाटते:-“उपक्रमांची खान,आहे ढेकणमोहा शाळा,लावते जीव अन लळा, माझ्या लाडक्या बाळा”
शब्दांकन/स्वानुभव
श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे,
मुख्याध्यापिका,प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड
मोबाईल – 9420025078
खूप छान उपक्रम यामुळे प्रत्येक मुले उपस्थित राहणार मुलांत उत्साह निर्माण होईल, प्रत्येक वर्गात स्पर्धा निर्माण होईल.
Great