इंग्रजीकडून मराठीकडे..

जिल्हाअंतर्गत बदलीने मागील आठ महिन्यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव नाथापूर केंद्रातील या शाळेमध्ये जॉईन झाले. बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी संख्या. अजूनही गावाला शासनाच्या लालपरीची सोय नाही. रस्त्याची ही दुर्दशा. शाळेला जायचं म्हणजे बीडपासून ३५ किमी दूर. पण तरीही काम करण्याची जबरदस्त इच्छा शक्ती घेऊन दररोजचा प्रवास. का कोण जाणे नेहमी मला अशाच शाळा मिळतात.आपणच हे काही करू शकतो म्हणूनच की काय .. अस वाटत. नेहमीचच मनापासून काम करणं, विद्यार्थ्यांसाठी धडपडणे, पालकांमध्य शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणं.. माता पालक संघ स्थापन करणे, व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून नवनवीन शैक्षणिक कल्पना पालकांमध्ये रुजवणे हे जणू नित्याचच झालं. अवघ्या दहा मुलांमध्ये तीन तास सांस्कृतिक कार्यक्रम हे एक आगळे वेगळे समीकरण करून दाखवलं. गाव जरी छोटे असले तरी गावाचा सपोर्ट आपल्या कामामुळे मिळत गेला. अवघ्या तीनशे कुटुंब असणाऱ्या या गावांमधून दीड ते दोन लाखापर्यंतचा लोकसहभाग मिळाला. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती केली. वेगवेगळ्या कृतींचे,वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांचे व्हिडिओज आजूबाजूच्या परिसरामध्ये वायरल होऊ लागले. आजूबाजूच्या परिसरामध्ये आता शाळेविषयी चर्चा रंगू लागली. त्याचाच फायदा 2026 मध्ये शाळेच्या विद्यार्थीपटासाठी झाला. आजूबाजूला बरेच इंग्रजी शाळा आहेत.तसेच खाजगी शाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल पाहून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण तयार झाले. प्रत्येक गावकरी सहकार्यासाठी धावू लागला. माता पालकांचे गट सक्रिय झाले. जिथे आजपर्यंत कोणी आले नव्हते,तिथे निपुण महाराष्ट्र अंतर्गत विभागाचे समन्वयक हाकाळे साहेब यांनी माता पालक गटाला भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. माता पालकांच्या प्रेरणादायी कामाचे उल्लेखनीय कामाचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील बदल प्रकर्षाने जाणू लागला आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्यासाठीचे मतपरिवर्तन झाले. आणि शाळेमध्ये झाले इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश. गेल्या वर्षी दहा पटाची असणारी शाळा आज 21 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व बाहेरून येणारे विद्यार्थी आहेत. एकही विद्यार्थी यातील गावातील नाही. खरोखर हे आपल्या प्रामाणिक कामाचे फळच म्हणावे लागेल. या विद्यार्थ्यांमध्ये एका डॉक्टरांचा मुलगा सुद्धा प्रवेशित झाला आहे. जिथे कोणाला जमले नाही त्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल करताना मनाला आनंद होतो. यांच्या पालकांना वाटणारा आनंद पाहून त्याहून जास्त अभिमान वाटतो.

.

Leave a Comment