शिष्याची गुरू पाद्यपूजेसाठी थेट गुरुगृही भेट

१६ वर्षापूर्वीची माजी विद्यार्थिनी थेट गुरुला भेटण्यासाठी घरी…२०१० ला चौथी वर्ग संपून शिक्षणासाठी तिच्या गावी गेली. हो तिच्याच गावी.. शिक्षणासाठी ती मामाकडे शहाबाजपूर येथे राहत होती.जिथे माझी नोकरीची सुरुवात झाली होती.सोनू म्हणजे अगदी आज्ञाधारक आणि नम्र.तीतकीच जिज्ञासू,अभ्यासू ,गोड,लाघवी…. खूप मन लावून अभ्यास करायची.तिच्या काकांना तिनं खूप मोठं व्हावं,खूप शिकावं अशी खूप इच्छा होती. तिला भेटण्यासाठी आले की आवर्जून शाळेत येऊन तिची चौकशी करायची.खूप चांगले शिकवा मॅडम, आवर्जून सांगायचे. सोनू,आता पुढे काय देणार मॅडम असं म्हणत हसत खेळत अभ्यास करायची.मीही अगदी पहिल्यापासूनच मुलांमध्ये मूल होऊन राहायची,त्यांच्यासोबत खेळायची.चौथी वर्ग संपल्यानंतर जेव्हा ती शिकण्यासाठी तिच्या गावी गेलेत त्यानंतर मात्र बऱ्याच दिवसानंतर संपर्क होऊ शकला नाही. झाला तो संपर्क थेट कोरोना नंतर. तिच्याकडे माझा नंबर होता म्हणे.पण तिने संपर्क केला नाही.तिला जेव्हा विचारलं,तेव्हा तिने सांगितलं मॅडम,तुम्ही जर मला विचारलं की, तू आता काय करत आहेस ?तेव्हा मी तुम्हाला काय सांगणार? मी जेव्हा काहीतरी स्वतः करेल, स्वतःच्या पायावर उभा राहिल, तेव्हाच मी तुमची प्रत्यक्ष भेट घेईल आणि बोलेल.असं मी ठरवलं होतं असं म्हणत होती.कोरोना काळामध्ये स्वतः खूप स्ट्रगल मध्ये शिक्षण घेतलं.कधी खूप अडचणी आल्या मॅडम.पण मॅडम,मला त्यावेळी फक्त डोळ्यासमोर तुम्हीच दिसत होता.त्यामुळे मी तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आणून स्वतःला खचू दिलं नाही आणि शिकत राहिले.घरची परिस्थिती नव्हती,पुढे शिकवण्यासाठी.पण मी हट्ट धरला आणि मग शिकवण्यासाठी घरचे तयार झाले.खूप खूप स्ट्रगल केला.मॅडम, माझ्या जीवनात जर कोणी आदर्श असेल तर त्या फक्त तुम्ही आहात.. आणि आता नुकतंच महसूल सहाय्यक,कलेक्टर ऑफिस जळगाव येथे रुजू झाली आहे.अजूनही अभ्यास करते आहे मॅडम अजून खूप पुढे जायचं.मॅडम,सारखं तुमचं नाव काढते सोनू.. असं तिचे बाबा सांगत होते. अतिशय लाघवी असणारी प्रियंका थेट घरी आली होती.थेट तिच्या मॅडमला भेटण्यासाठी.तिच्या बाबांना घेऊन घरी आली.तिने जेव्हा चरण पूजा केली तेव्हा खरोखर मन अगदी हेलावून गेले.हळवे झाले.नकळत डोळ्यातून आनंदाश्रू आले. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाच्या आनंदाचा सोहळा..याची देही याची डोळा साजरा करत होते.साडी,ओटी,पाद्यपूजा आणि सगळच अनोखं… हे सगळं होत असताना तिचे बाबाच्या डोळ्यात नकळत पाणी येत होते. आपले विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे यशस्वी होऊन परत येतात..तेव्हा गुरुला आकाश ठेंगणे होते.

Leave a Comment