2018 सालची गोष्ट. कधीच न ऐकलेल्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या. त्या प्रत्यक्ष 2018 साली झाल्या आणि हेच वर्ष माझ्या आयुष्यातील कायम आठवणीतील वर्ष.
हो, आठवणीतीलच म्हणायचं. आज पर्यंत झालेल्या नोकरीच्या काळामध्ये शाळा म्हणजे मुलांचा मेळा आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा तयार केलेला मळा एवढेच माहिती. पण ऑनलाईन बदलीने मिळालेल्या शाळेमध्ये मुलांचा मेळाच नव्हता तर उपक्रमांच्या मळ्याचा प्रश्नच नव्हता. ही गोष्ट आहे मला बदलीने मिळालेल्या ढेकणमोहा जिल्हा परिषद शाळेची. नोकरीच्या कालावधीमध्ये कोणत्याच शाळेमध्ये जे अनुभव मिळाले नव्हते ते पूर्ण अनुभव किंवा त्याहीपेक्षा पुढचे माझ्या लेखी कल्पनेपलीकडील अनुभव होते ते. हो अगदी कल्पनेपलीकडील!!!शब्दांच्या पलीकडचे.
शाळेत रुजू झाले तेव्हा शाळा म्हटलं की, डोळ्यासमोर एक छानसं बोलक्या भिंतीच चित्र, तिथे रमणारी, बागडणारी, स्वच्छंदपणे मित्र-मैत्रिणींमध्ये रमत खेळणारी मुलं हे चित्र.. पण यापैकी या शाळेमध्ये तर काहीच नव्हतं. मनात प्रश्न होता ही अशी ही शाळा असू शकते? मला तर मुळातच मुलांमध्ये रमण्याची आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे कृती, उपक्रम, खेळ खेळत त्यांच्यामध्येच रमायची मुळातच सवय. पण आता मग हे सगळं करायचं कुणाबरोबर? हा पहिला प्रश्न मनामध्ये उभा राहिला आणि इथली परिस्थिती पाहून अनेक प्रश्नांचे काहूर मनामध्ये घर करू लागले. पण आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते कारण माझं उपक्रमशील मन मला कधीच बसू देणार नव्हतं. शाळेत मुलंच नाही ती शाळा कसली? सुरुवात झाली ती शाळेत मुलं जमा करण्यासाठी. बरं मुलं आणावीत कुठून? नीटसं कोणी बोलतही नसेल किंबहुना दारात सुद्धा उभा करत नसे. शाळेत प्रवेश द्या म्हणायला गेलं तर काहीतरी उलट सुलट ऐकून घ्यावं लागे. काहीतरी विचित्र बोला ऐकावे लागे. वेगवेगळ्या अनुभव दररोज येत होते पण हे सगळं ऐकून घेतल्याशिवाय पर्यायही नव्हता. तरीही समोरच्या व्यक्तीला आत्मविश्वासाने मुलांच्या प्रगती विषयी हमी देत होते. कोणी ऐकून घेत असे तर कोणी मध्येच,आम्हाला जिल्हा परिषद शाळेत लेकरू घालायचंच नाही तर सांगता कशाला ?असेही म्हणायचे. कुणी काहीही म्हटलं कसंही वागलं कसंही बोललं तरी आम्ही(मी आणि माझ्या सहकारी शिक्षिका)मात्र त्यांना पटवून देण्याचा अगदी मनातून प्रयत्न करत होतो. तुमच्या शाळेत पोराचं नाव घातले की, त्याला लिहिता येत नाही आणि वाचताही येत नाही. मग घालायचं कशाला?असं जेव्हा समोरच्याकडून यायचं, तेव्हा मी त्यांना आत्मविश्वासाने सांगायची,” दोन महिन्यात जर तुमच्या मुलाला वाचता-लिहिता नाही आलं तर माझ्या हाताने मी दाखला लिहून देईन.तेव्हा थोडसं कुठेतरी ऐकण्याची मानसिकता समोरच्याची व्हायची. किमान दारासमोर उभा तरी करायची. असाच हळूहळू आमचा प्रवास दररोज सकाळी सुरु व्हायचा.तो असा दररोज आठ ते दहा दिवस नित्यनेमाने शाळा उघडायच्या आधी चालायचा. शाळेत मुलच नव्हती तर शिकवणार तरी कोणाला?हा प्रश्न होताच..होती ती नाममात्र.त्यांनाही बोललेल धड कळत नसे. त्यांना फक्त एकच बोलता येत होते,”मॅडम,घरी कधी जायचय. दिवसभर फक्त तेवढच कानावरती पडायचं.वाचन आणि लेखन हे तर त्यांच्या गावीच नव्हतं.सुरुवातीला तरी किमान मुलांनी फक्त शाळेत रमाव एवढीच अपेक्षा होती.पहिल्या वर्षी शाळेत आता पाच विद्यार्थ्यांची 30 विद्यार्थी संख्या झाली होती. आणि मग काहीतरी मुलांसाठी वेगळं करावं ही उर्मी ही ऊर्जा तयार झाली.
खऱ्या अर्थाने आता शाळा सुरू झाली होती. मुलांना शाळेत रमण्यासाठी मी सतत काही ना काही म्हणजे गाणी,गोष्टी, खेळ जेणेकरून मुलांनी शाळेत रमावं आणि दिवसभर टिकून रहावं यासाठी काही ना काही मुलांना आवडेल,रुचेल असे करत असे. खूप सार्या महत्प्रयासाने यासाठी मुलं सहा महिन्यानंतर शाळेत रमू लागली होती. सुरुवातीचे तीन महिने जवळपास आम्हाला पोटभर जेवण सुद्धा मिळत नसे. मुलं फक्त सांभाळणं हेच एक आमच्यापुढे आव्हान होतं. ते आव्हान आता जवळपास आम्ही आत्मविश्वासाने पेलत होतो. शाळेत जॉईन झाल्या दिवसापासूनच मी पालकांचा एक व्हाट्सअप ग्रुप बनवला होता.ज्यामुळे पालकांना आपलं मूल शाळेत काय करत आहे हे समजावं. माझ्या Dhere Usha या शैक्षणिक चॅनल मार्फत मुलांचे कृती उपक्रमाचे व्हिडिओ पालकांपर्यंत पोहोचत होते. आता पालकांचाही विश्वास हळूहळू वाढू लागला होता. शाळेचा परिसर मुलांच्या आवाजाने दणाणून गेला होता.शाळेत चाललेल्या पूर्ण कृती उपक्रमांचा आवाज पालकांपर्यंत पोहोचत होता. प्रत्येक जण गावातीलच नाही, तर गावाच्या आजूबाजूच्या 10 गावातील लोक शाळेच्या उपक्रमाची चर्चा आपसात करत होती. कामाच्या हातोटी बद्दल बोलत होती मोडकळीस आलेली शाळा आता चांगलीच बहरू लागली होती. आज पर्यंत जे कुणाला जमलं नाही ते मॅडमनी खूप प्रयत्नांनी शाळा उभा केली असं प्रत्येक जण बोलत होता. ऑक्सीजन वरील शाळा आता मनमोकळेपणानं श्वास घेऊ लागली होती. माझ्या मुलाला जेव्हा वाचता येईल, तेव्हा मी शाळेत नाव घालीन असं म्हणणाऱ्या पालकांनी देखील आता मुलांचं नाव शाळेत दाखल केलं होतं. प्रत्येक पालक समाधान व्यक्त करत होता. आणि आता पालकांकडून ग्रामस्थांकडून शाळेला वस्तू रुपामध्ये लोकसहभाग जमू लागला होता. गावात कोणाचाही वाढदिवस असेल तर ती व्यक्ती शाळेतील मुलांसाठी शालेय उपयोगी वस्तू लोकसहभागाच्या माध्यमातून देऊ लागले. गावात एकूण चार शाळा होत्या त्या तोडीमध्ये पूर्वीची ही एकेकाळची केंद्रीय शाळा होती परंतु काही कालांतराने कोणी जाणे उतरती कळायला लागली आणि 800 विद्यार्थ्यांची फक्त पाच विद्यार्थी संख्या राहिली होती. आता मात्र प्रत्येक पालकाचा विश्वास विद्यार्थी गुणवत्तेबद्दल वाढू लागला होता. हळूहळू गाव,गावाचा परिसर प्रत्येक ग्रामस्थ,प्रत्येक व्यक्ती यांच्या मनामध्ये शाळेबद्दल,आमच्याबद्दल,मुलांमध्ये झालेल्या बदलाबद्दल मनामध्ये सकारात्मकता तयार झाली होती.
आता हळूहळू पालकांचा ओढा शाळेकडे वाढू लागला. दरवर्षी आता विद्यार्थी संख्या आलेख वाढतच गेला. प्रत्येक पाठ,कविता किंवा एखादी संकल्पना ही मुलांमध्ये कृती मधून आनंददायी पद्धतीने उतरत होती. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतल्याने प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास चमकत होता.त्यातच निपुण महाराष्ट्र अंतर्गत शाळेतील पहिली ते तिसरीच्या माता पालकांचे गट तयार करण्यात आले.त्यांच्या आठवडी कार्यशाळा होऊ लागल्या. त्यासाठी अधिकारी भेटी सुद्धा वाढल्या. येणारा प्रत्येक जण शाळा आणि गुणवत्ता याविषयी समाधान व्यक्त करत असे. कारण प्रत्येकाने यापूर्वीची ढेकणमोहा शाळा आणि आता पूर्णपणे बदललेली शाळा अनुभवली होती. विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम,कृती याचे पुस्तक आणि ज्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी रमू लागला ,ज्यांच्यासाठी मी गाणी गायली, लिहिली, तीच गाणी मी पुस्तक रूपाने उतरवली. अगदी कोरोना काळात सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख क्रमाने वाढतच केला. कोरोनामुळे सर्व जग थांबलं होतं तरी सुद्धा ढेकणमोहा शाळेमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सातत्याने सुरूच होतं. याची दखल बीड जिल्हा परिषदेने घेऊन जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 साली प्रदान केला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार राज्यातील एकमेव एका शिक्षकाला दिला जातो तो तो देऊन लोकमतने आणि गावकऱ्यांनी सुद्धा खूप मोठा सन्मान केला.एवढेच काय तर ABP माझा या वृत्तवाहिनीने मुलाखत तसेच सामना आणि टाइम्स ऑफ इंडिया (TOI )अशा वृत्तपत्रांनीही कार्याची दखल घेतली. यूट्यूब च्या माध्यमातून देशाबाहेर सुद्धा आता शाळा पोचली होती. या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आणि वेगवेगळ्या पुरस्कारांनी मला पुरस्कृत केले. आम्हाला कुठेतरी कामाची पावती मिळत होती. गावकऱ्यांनी देखील कामाची प्रत्येक वेळी दखल घेऊन सत्काररुपी सन्मान केले. 2018 ला वर्ग एक ते चारची असलेली 5 ही पटसंख्या आता 2024 साली 85 वर पोचली. माझ्या Dhere Usha या शैक्षणिक youtube चॅनेलवरती माझ्या ढेकणमोहाच्या विद्यार्थ्यांचे जवळपास 4000 च्या पुढे उपक्रमाचे व्हिडिओ आहेत.आता माझ्या या शाळेमध्ये बाजूच्या गावांमधून सुद्धा विद्यार्थ्यांचा एक रिक्षा भरून येतो. त्यामध्ये इंग्रजी शाळेमधून सुद्धा माझ्याकडे प्रवेश झालेले आहेत याचा मला मनोमन आनंद आहे. आज जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या पाहता माझ्या शाळेचा मात्र विद्यार्थी संख्येचा आलेख सातत्याने वाढतो आहे तो फक्त उपक्रमाच्या जादूनेच.शेवटी एकच म्हणावेसे वाटते.
“लहरो से डरकर नौका पार नही होती,
कोशिश करने वालो की हार नही होती”
Dhere Usha youtube चॅनेल लिंक
https://youtube.com/@dhereusha1309?si=sSH3JIQxgTZySInc

वरील लिंक वरून शाळेचे संपूर्ण उपक्रम कृती आपण पाहू शकता.
शब्दांकन/स्वानुभव
श्रीमती ढेरे उषा बप्पासाहेब
शिक्षिका,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा.
ता. जि.बीड
खूप छान, आज जिल्हा परिषद शाळेचे वरचेवर पटसंख्या कमी होत असताना हा विद्यार्थी संख्येचा वाढता आकडा पाहून खूप अभिमान आणि आनंद आहे. आपल्या उपक्रमाचा निश्चितच सर्वांना उपयोग होत आहे.
Hearily Thanks for your best compliment
Nice article
Thanks for motivation