शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांचे शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन

दिनांक 30 एप्रिल 2025 अचानक बीईओ कार्यालय,बीड येथून सकाळी साडेअकरा वाजता फोन येतो.मॅडम,तुम्हाला दुपारी दोन वाजेपर्यंत छत्रपती संभाजी नगरला जायचे आहे. मुलं वर्गाबाहेर खेळत होती.घाई घाईने मुलांना,मला लवकर जावे लागेल असं सांगितलं मुलांनीही तितक्याच तत्परतेने खेळाचे सामान व्यवस्थित पॅक करून वर्गामध्ये ठेवलं आणि मी शाळेतून निघाले .बीडला पोहोचेपर्यंत बारा वाजले असतात. आज अक्षय तृतीया असल्यामुळे पक्ष जेवायला जायचे होते. घाईघाईने जेवणामध्ये लक्ष नव्हते. पटकन कसं बस एक वाजेपर्यंत निघालो मिळालेले ऑफिशियल पत्र घाई घाईने वाचलं, तर त्यामध्ये उपक्रमशील शिक्षकाने स्वतःची पीपीटी सोबत आणावी असे लिहिलेले होते. गाडीत बसल्यानंतर पीपीटी तयार केली आणि संभाजीनगरला तीन वाजता पोहोचलो.

विभागीय आढावा बैठकसाठी माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे आगमन झाले. राष्ट्रगीत आणि राज्य गीत यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यामधून प्रत्येकी दहा ते अकरा शिक्षक उपस्थित होते. वेळेअभावी चार ते पाच शिक्षकांच्या शाळेत राबवलेल्या उपक्रमांचे पीपीटी द्वारे सादरीकरण घेण्यात आले. त्यानंतर अधिकारी वर्ग सी. बी.एस. इ.ची शाळा यांचीही सादरीकरण झाले.

त्यानंतर बैठकीचे मुख्य आकर्षण असलेले आदरणीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक शिक्षकांनी स्वतःच्या शाळेवर राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम साहेबांना खूप भावले. राज्यातील जिल्हा परिषदेतील शाळेची गुणवत्ता यावर खूप भरभरून कौतुक केले. बऱ्याच शाळेची उदाहरणेही दिली. अगदी हसत खेळत अशा वातावरणामध्ये शिक्षकांना शाळा स्तरावर येणाऱ्या अडचणी कशा कमी करता येतील या संदर्भातही चर्चा केली. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी शिक्षक शाळेत खूप मेहनत घेत आहेत असेही ते म्हणाले. लहान वयापासूनच मुलांना घरातूनच संस्कार मिळण्यासाठी पालकांनी काय करायला हवे यावर देखील अगदी छान सविस्तर चर्चा केली. प्रत्येक उपक्रमशील शिक्षकाच्या ज्ञानाचा उपयोग शाळेपुरताच मर्यादित न राहता तो केंद्र, तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर सुद्धा त्याचा सर्वांना उपयोग व्हावा त्यांच्या उपक्रमाची प्रेरणा इतरांनाही मिळावी यासाठी विभाग स्तरावर एक वेबसाईट तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून स्वतःच्या शाळेवर राबवलेले प्रत्येक गुणवत्ता पूर्ण उपक्रम शिक्षकांना वेबसाईटवर अपलोड करता येतील असे सांगितले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माझा जिल्हा परिषदेमधील विद्यार्थी कुठेही कमी पडू नये या हेतूने 2025- 26 पासून सीबीएसई अभ्यासक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवला जात आहे आणि त्याबाबत सकारात्मकता दिसून येत आहे असेही ते पुढे म्हणाले. आत्ताच लागलेल्या यूपीएससी या परीक्षेमध्ये 50% विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील आहेत हेही अगदी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे असे उद्गार आदरणीय भुसे साहेबांनी काढले. शाळेची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा याकडेही इथून पुढे जास्तीत जास्त लक्ष राहील असे सांगितले. विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण मिळावं हा एकच हेतू आहे.

आजच्या या आढावा बैठकीच्या निमित्ताने विभागातील उपस्थित असलेल्या उपक्रमशील शिक्षकांना भेटून विचारांची देवाणघेवाण करत खूप आनंद वाटत होता. काहीतरी नवीन शिकायला मिळत होते. बऱ्याच जणांनी माझ्या फेसबुक वरील ‘उषाचे उपक्रम’ या पेजचे भरभरून कौतुक केले. त्यावर असणाऱ्या उपक्रमाचे आणि माझ्या Dhere Usha चॅनलवर असणारे माझ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व्हिडिओ बऱ्याच जणांना भावलेले दिसून येत होते. त्याबद्दल बरेच शिक्षकांनी विचारले सुद्धा. आपण केलेल्या चांगल्या कामासाठी व्यक्त होण्याची छान संधी मिळत होती. शेवटी ज्या शाळेन मला लेखिका,कवयित्री बनवलं आणि ज्यांच्यासाठी मी गेल्या सात वर्षापासून सातत्याने अनेक उपक्रम राबवते आहे आणि त्याच उपक्रमाचं बनवलेलं गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम, ऐसा घडवू बालक आणि माझ्या इयत्ता तिसरी वर्गाचं विद्यार्थी हस्तलिखित हे तीनही पुस्तक आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना देण्याचा योग आला. एकूणच आजचा हा धावता दौरा नक्कीच प्रेरणादायी होता.

Leave a Comment