बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या शाळेत ११ मार्च २०२४ रोजी महिला दिन आयोजित करण्यात आला होता. त्या अनषंगाने शाळेत माता पालकांसाठी शाळेने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.पाककला स्पर्धा,खेळ यासारखे उपक्रम आयोजित केले होते.या प्रसंगी ढेकणमोहा शाळेच्या मुख्याध्यापिका,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना शाळेचे मुख्याध्यापक बगाडे सर,शिक्षीका प्रतिमा मोरे, तावरे मॅडम,शेख सर,खटावकर सर यांनी निमंत्रित केले होते.महिला दिनानिमित्त तेथील माता पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ढेरे मॅडमचे व्याख्यान आयोजित केले होते.तसेच पाककलेचे परिक्षणाची जबाबदारीही दिली होती. सुरुवातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब आणि मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या वतीने उषा ढेरे मॅडम यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.प्रसंगी उषा ढेरे मॅडम यांनी तेथील मातांशी खूप छान संवाद,चर्चा आणि मार्गदर्शनही केले.१ ली ते ३ रीच्या मुलांना मातांनी छोट्या छोट्या कृती कशा करून घ्याव्यात..मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मातेची महत्त्वाची भूमिका कशी असली पाहिजे.त्यासाठी मातेने मुलाला कसं जाणून घ्यायला हवं,हेही वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितले.प्रत्येक मूल वेगळं आहे याची जाणीव प्रत्येक पालकाने ठेवली पाहिजे असंही मॅडमने त्यांच्या चर्चासत्रात मातांना संबोधित करताना सांगितले.शेवटी माता पालक यांच्या पाक कलेच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी मॅडम आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेसाठी आलेल्या २१ पदार्थांचा आस्वाद घेतला.खेळही घेतला.शेवटी त्यांचा निकालही देण्यात आला.विजेत्या माता आणि सहभागी मातांना शाळेकडून बक्षीसही देण्यात आले. शेवटी उषा ढेरे मॅडम आणि निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक श्री हाकाळे साहेब यांचा रोप देवून सन्मान करण्यात आला. उषा ढेरे मॅडम यांनी शाळेच्या स्टाफला त्यांचे स्वतःचे स्वलिखित “नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम” हे पुस्तक शाळेला तसेच केंद्रप्रमुख धायतिडक सर यांनाही केंद्रासाठी पुस्तक भेट दिले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका प्रतिमा मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पिंपरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख,शाळेचे मुख्याध्यापक,शाळेतील सर्व शिक्षक, माता पालक,गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.