अनोखे वृक्षाबंधन

अनोखे वृक्षाबंधन..

श्रावण महिना म्हटलं की सणावारांची अगदी रेलचेल असते. आपण अगदी कुठेही असो, सण आपण अगदी मनापासून आनंदाने साजरे करतो. आणि ते जर वेगळ्या पद्धतीने केले तर त्याचा आनंदही तितकाच वेगळा आणि समाधानकारक असतो.अगदी तसाच हा श्रावण महिन्यात येणारा, बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा,रेशीम धाग्याने बांधलेला हा रक्षाबंधन सण. घरोघरी हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि प्रेमपूर्वक साजरा होताना दिसतो. अगदी तशाच वातावरणामध्ये आम्ही सुद्धा हा सण आनंदाने उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला पण तो आहे वृक्षाबंधन. हो वृक्षाबंधनच.

२०१८ साली नवीन शाळेवर म्हणजे प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे १ जुलै दिवशी झाडे लावली. या झाडांना जीवापाड जपलं. त्याचं संवर्धन केलं. जसजसे दिवस जाऊ लागतील तसतशी झाड सुद्धा तितक्याच प्रेमाने, आनंदाने, हळूहळू बहरू लागली,डोलू बोलू लागली.जणू काही ती आमच्या प्रत्येक सादाला प्रतिसादच देत होती. आज २०२५ मध्ये ही लावलेली संपूर्ण झाडे अगदी फळधारणे साठी तयार झालेली आहेत. काही दिवसातच नक्कीच भरपूर फळे शाळेमध्ये मुलांना खायला मिळणार आहेत. कारणही तसेच आहे. या झाडांना आम्ही दरवर्षी १ जुलै २०१९ पासून फुग्यांनी सजवतो. वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाचे गाणे म्हणून रिझवतो. त्यांच्यासाठी आनंदाच्या टाळ्या देतो.हे ऐकून तर ही झाडे बहरली आहे.ढेकणमोहा शाळेमध्ये साजरा होणारा झाडांचा हा अभूतपूर्व उपक्रम. जसा पहिला वाढदिवस साजरा झाला तसाच यावर्षी सुद्धा सातवा वाढदिवस अगदी तेवढ्याच उत्साहाने आनंदाने आणि जोशपूर्ण आम्ही साजरा केला.फक्त वाढदिवसच नाही तर दरवर्षी रक्षाबंधन या सणाला पहिली राखी झाडाला बांधली जाते. झाड मानवासाठी काय आहे हे कोरोना काळाने आपल्याला निश्चित जास्त समजले आहे.बालवयापासूनच ही वृक्षबंधूची काळजी कशी घ्यायची हे रुजले तर निश्चितच लेकरांना सुद्धा झाडांचे महत्त्व कायम समजून घ्यायला सोपं होणार आहे. पाने,फुले, फळे, सावली,ऑक्सिजन आणि वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्यासमोर वेळेत हजर होऊन आपल्या उपयोगी पडून झाडे आपली मदतच करतात. हे एकदा का बालवयात बालमनावर बिंबले की वनस्पतीचे महत्व कायम बालमनावर कोरले जाते. वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपण हा मंत्र जणू आम्ही या उपक्रमातून मुलांना दिला. पुढे श्रावण महिन्यामधील येणारा रक्षाबंधन हा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील रेशीम धागाच. मग झाड सुद्धा आपल्याला भावाप्रमाणेच संरक्षण देतात,जीवन देतात,मानवाच्या जगण्यातील आनंद वाढवतात,त्यांनाही राखी बांधली तर..! हा विचार मनात आला आणि २०१९ पासून पहिले वृक्षबंधन सुरू केले. ते आज २०२५ पर्यंत. तेही अगदी साग्रसंगीत. दरवर्षी या वृक्ष बंधूंसाठी वेगळं काहीतरी मांडणी करायची, लिहायचं आणि गाण्याच्या रूपामध्ये स्वतःबरोबरच मुलांकडून वदवून, या वृक्षांना आळवून,त्यांचं आयुष्यभरासाठी संरक्षण मिळवायचं असंच आजपर्यंत ठरलेलं. हेच आज आमचे साजरी झालेले वृक्षबंधनाचे काही अनमोल क्षण.आजचे हे आमचे वाढदिवसाबरोबरच साजरी झालेली वृक्षा बंधनाचे सातवे वर्ष… झाडांचा वाढदिवस आणि वृक्षाबंधन एक अनोखे अतूट नात्याचे बंधन….!!!!

आज आहे राखी पौर्णिमा सण साजरा करूया……

.आपल्या वृक्षबंधुंना,राखी आपण बांधूया……

.मोठा बंधू वडदादा,गार गार सावली देतो,🥦

पहिली राखी वडदादाला,आपण सारे बांधूया…||१||

गोड जांभळे खायला देतो,वृक्षबंधू जांभूळदादा,🌳

दुसरी राखी जांभूळदादाला,आपण सारे बांधूया…||२||

तिसरा बंधू करंजा वृक्ष,शोभा मैदानाची वाढवतो,🌿

राखी त्याला बांधू,ऋणात आपण सदैव राहू…..||३||

अशोकदादा चौथा बंधू,आहे आमच्या सर्वांचा,🌲

चौथी राखीचा मान देण्या,राखी आपण बांधूया….||४||

बदामदादा बदाम देतो अन् खेळायलाही आधार देतो,🍀

पाचवी राखी त्याला बांधू,गाणे त्याचेच गाऊया…||५||वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन काळाची गरज ओळखूयात,

झाडे लावू,झाडे जगवू मंत्र आपण जपूया..🌲🌳🌴🍀🪴

आज आहे राखी पौर्णिमा,गाणे वृक्षांचे गाऊया…

स्वरचना✍️

श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे

शिक्षिका

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड🙏🙏🙏

1 thought on “अनोखे वृक्षाबंधन”

Leave a Reply to Sachin Pisal Cancel reply