एक अनोखा उपक्रम…

प्राथमिक शाळा ढेकणमोहा,येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस….

                    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक जुलै 2024 रोजी माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनानिमित्त शाळेत लावलेल्या झाडांचा आज सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला.

              आज ढेकनमोहा शाळेत मुलांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता.सकाळपासूनच एक वेगळीच लगबग चिमुकल्यामध्ये दिसत होती.शाळेत आल्या आल्या मॅडम, मी एक फुगा आणलाय. मी पण एक आणलाय. हो, माझा खूप मोठा फुगा आहे मॅडम. मी पण आणलाय,असा आजूबाजूला आवाज येत होता. शाळेत गेल्या गेल्याच मुलांनी एकच गलका केला. माझ्या आठवणीत नाही असं दाखवून मी त्यांना विचारता क्षणीच मॅडम, “आज एक जुलै आपल्या झाडांचा वाढदिवस नाही का ? म्हणून आम्ही सर्वांनी फुगे आणलेत. अशी चिमुकली सांगू लागली आणि सुरू झाली झाडाच्या वाढदिवसाची तयारी!! प्रत्येक जण एकेक काम वाटणी करत घेऊन ते पूर्ण करू लागला. प्रत्येक जण झाडाच्या वाढदिवसाची चर्चा करत होता आणि तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. मी माननीय वसंतरावजी नाईक यांचे चित्र रेखाटन करून फलक लेखन केले.कुणी आणलेली फुगे फुगवले, तर कोणी त्याला दोरा बांधला. काही जणांनी ती झाडाला बांधली देखील. आम्ही झाडाच्या वाढदिवसाची तयारी जणू काही मुलांच्या वाढदिवसाच्या तयारी इतकीच करत होतो. वेगवेगळ्या रंगीत रंगीत फुग्यांनी ही हिरवीगार झाडे अगदी आनंदाने डोलत होती. जणूकाही त्यांनाही त्यांच्या वाढदिवसाचा आनंद अगदी भरभरून वाटत होता आणि ती व्यक्त होत होती असंच वाटत होतं. प्रत्येक झाडांना फुगे बांधण्यात आली. छान अगदी झाड डौलाने डोलू लागले. आज झाडं सुद्धा खूप ताजीतवानी वाटत होती. जणूकाही त्यांचा हा वाढदिवस आणि त्याचा हा आनंद झाडांना सुद्धा गगनात मावेनासा झाला होता. मुलांना परिपाठासाठी छान रांगा करण्यास सांगितल्या. परिपाठ घेतानाच परिपाठामध्ये शाळेतील शिक्षिका जायभाय मॅडम यांनी मुलांना झाडाची एक बोधकथा सांगितली. मुलेही अगदी त्यात रमून गेली होती त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेरे मॅडम यांनी मुलांना लावलेल्या झाडाची पार्श्वभूमी सांगून झाडांना कसं जपलं पाहिजे ?कसं वाढवलं पाहिजे ? झाडामुळे मानवाला काय फायदे होतात ? झाडांचे उपयोग काय असतात ? इत्यादी माहिती अगदी सविस्तर आनंददायी वातावरणामध्ये सांगितली. मुलं सुद्धा अगदी मन लावून ऐकत होती.अधून मधून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरही देत होती. झाडांविषयी भरपूर चर्चा करत होती. त्यांना जणू काही हे सगळं मनापासून पटत होतं झाड का लावावं ?त्याचं रोप कसे तयार करावे ? प्रत्येकानं झाड का लावावे ? ते कसे वाढवावे ?त्याची काळजी कशी घ्यावी ? इत्यादी बाबतीत मुलांबरोबर अगदी सविस्तर चर्चा झाली. मुलांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या वाढदिवसाइतकाच आनंद झाडांच्या वाढदिवसाचा आनंद दिसत होता. प्रत्येक जण जणू काही स्वतःचाच वाढदिवस साजरा करत आहे असा दिसत होता.झाड सुद्धा कान देऊन हे सगळं ऐकत होती आणि छान बहरलेल्या हिरव्यागार पानांना हलवून प्रतिसादही देत होती. आज झाडांचा सहावा वाढदिवस खरोखरच हा अनोखा उपक्रम मुलांच्या मनावर एक वेगळाच परिणाम करताना दिसून येत होता. मुलांना अगदी काहीही न सूचना देता त्यांना झाडाचा वाढदिवस लक्षात राहणे हे खरंच मनाला सुखदायक असे होते. खरोखरच शाळेमध्ये अशा वेगवेगळ्या उपक्रमांचा खजिना मुलांना शोधायला मिळत असतो आणि मुलंही त्यामध्ये अगदी सहजपणे रमून जातात.इतकच काय तर ते या प्रत्येक उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होतात, म्हणून बालवयामध्येच जर असे अनोखे संस्कार मुलांमध्ये रुजले तर नक्कीच मुलांना सुद्धा त्यांच्या भविष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार झाल्या वाचून राहणार नाही.खरोखर ढेकणमोहा शाळा म्हणजे उपक्रमशील शाळा अशी पंचक्रोशीत शाळेची एक नवी ओळख निर्माण झाली आहे विविध अशा मनोरंजक आनंददायी उपक्रमांचा खजिना म्हणजे ही शाळा. मुलांना देखील असे वेगवेगळे उपक्रम असतील तर शिक्षणाबरोबरच संस्कार आणि आनंद हे अगदी सहजच मिळून जाते. अशा अनेक विविध उपक्रमामुळे मुलांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण होते. एक नवा उत्साह त्यांच्यामध्ये संचारतो. शिक्षणासाठी नव्हे शिकण्यासाठी त्यांचं मन अगदी प्रसन्न होतं आणि सुरू होतो त्यांचा शाळेतील रोज नवा प्रवास. अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून मुलं स्वयंअध्ययनरत होतात आणि स्वतःच अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये गुंतून जातात. म्हणूनच प्रत्येक उपक्रम मग ती जयंती असो, पुण्यतिथी असो, सण असो की एखादा उत्सव असो.शाळेत एक वेगळाच उत्साह दिसून येतो.

             2018 रोजी शाळेत लावलेल्या जांभूळ,करंजीचे झाड, अशोकाचे झाड, बदाम या झाडांचा दरवर्षी आनंदाने वाढदिवस साजरा होतो. सतत पाच वर्ष झाडांचा वाढदिवस साजरा केल्याने आप सुखच मुलांना आजचा हा सहावा वाढदिवस सांगण्याची आवश्यकता सुद्धा भासली नाही. ही भावनाच खूप सुखकारक होतो.फक्त पुस्तक वाचन म्हणजे शिक्षण असं नव्हे तर वेगवेगळ्या उपक्रमाने मुलं शाळेमध्ये समृद्ध होत असतात. त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये या वेगवेगळ्या उपक्रमांचा एक अनमोल वाटा असतो जो त्यांच्या जडणघडणीमध्ये मैलाचा दगड ठरत असतो.अशाच प्रकारे आज शाळेतील या झाडाच्या वाढदिवसाने शाळेतील फक्त मुलंच नाही तर झाड सुद्धा मनोमन आनंदून गेली होती.

शेवटी —

 “झाडे लावू,झाडे वाढवू,

  पाणी घालू,त्याला वाढवू..”

        या घोषणेने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.मुलांप्रमाणेच झाडं देखील आज त्यांच्या वाढदिवसाचा आनंद घेत होती.

Leave a Comment