प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट

प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट..

आज दि.२१/२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील वर्ग २ री ते ४ थी च्या ५४ विद्यार्थ्यांनी बीड शहरात आतापर्यंत न झालेल्या,बीडकरांनी पहिल्यांदाच अनुभवलेल्या
शिवप्रेमी,शिवजन्मोत्सव समिती,बीड आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट देवून प्रत्येक शस्त्रविषयी माहिती जाणून घेतली.इतिहासामध्ये ऐकलेल्या, वाचलेला गोष्टीरूप इतिहास मुलांना ऐकायला मिळत होता,प्रत्यक्ष पहायला मिळत होता.तसेच छञपती शिवाजी महाराजांनी युध्दात वापरलेली शस्त्र,त्यांचे उपयोग आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या शस्त्राचा वापर कोणत्या वेळी कसा केला हे प्रात्यक्षिकासह अनुभवले.इतिहासातील काही रंजक गोष्टीही मुलांनी ऐकल्या.शस्त्र आणि त्याच्या वापरातील कौशल्यविषयी,वजनाविषयी अधिक प्रत्यक्ष,उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.
प्रदर्शन भेटीनंतर ऐतिहासिक वारसा लाभलेले कंकालेश्वर मंदिरास भेट दिली.तेथे सर्वांनी छान सामूहिक भोजनाचा परमानंद घेतला.त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्याना या मंदिराविषयी अगदी सविस्तर माहिती सांगितली.मुलांनी हे अगदी आनंदाने या सर्व गोष्टींचा आनंद घेत,माहिती जाणून घेतली.छान फोटोग्राफी झाल्यानंतर आम्हीं सर्वांनी बीडमधील असलेल्या सुंदर अशा वैष्णोदेवी मंदिराकडे प्रस्थान केले.खूप कुतूहल,आनंद आणि सहलीचा आनंद घेत मुलांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले.तिथे जाण्याचा मार्ग अनोखा असल्याने त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.छान अगदी मनमुराद आनंद घेतल्यानंतर पुढे आम्ही निघालो ते खंडेश्वरी माता दर्शनासाठी.मुलांनी छान शांतपणे दर्शन घेऊन भरपूर खेळ,फिरणे झाले असल्याने वडापाव आणि जिलेबीवर यथाशक्ती ताव मारला.खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.तोपर्यंत घड्याळातील काटे चार कडे झुकली होती.मुलांचं खेळ,माहिती,ज्ञान आणि मनोरंजन भरपूर झालं होत.मुलांचं हवं तेवढं खेळून झाल्यानंतर ढेकणमोहाकडे प्रस्थान झालं.
एकूणच आज मुलांनी बीड मधील शिवकालीन शस्त्रप्रदर्शन,ऐतिहासिक वारसा लाभलेले कंकालेश्वर मंदिर आणि वैष्णोदेवी आणि खंडेश्र्वरी देवी मंदिर ही धार्मिक स्थळे पाहून,जाणून घेण्याचा खूप छान प्रयत्न केला आणि ज्ञानाचे पक्के दृढीकरण करण्यासाठी प्रात्यक्षिकासह निरिक्षणातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या.अनुभवल्या…ज्यामुळे नक्कीच मुलांना फायदा तर होणारच आहे पण मिळालेलं ज्ञान चिरकाल टिकण्यास मदतच होणार आहे.
आज मुलांनी बीड दर्शनाचा अगदी भरभरुन आनंद घेतला.या सर्व नियोजनामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम उषा ढेरे मॅडम,सहशिक्षिका सुलोचना उंदरे मॅडम यांना शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Comment